अंधार्‍या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार

| खोपोली | प्रतिनिधी |

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर मंगळवारी (दि. 24) रात्री एक थरारक अपघात घडला. शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे असणार्‍या खिंडीत अक्षय अशोक महाजन (29, रा. सुकापूर, नवीन पनवेल) हा युवक पुण्याहून पनवेलला जात असताना दरीत कोसळला. त्याने स्वतः आपण दरीत कोसळलो असून, खाली घसरत चाललो आहे, याची माहिती वडिलांना फोनद्वार दिली. या अक्षयच्या फोननंतर शोधकार्य सुरू झाले.


लोणावळा शहर पोलीस आणि खोपोली पोलीस यंत्रणेनेने तात्काळ पावले उचलत मुंबई-पुणे हायवेवर त्याचा शोध सुरु केला. अक्षय दरीत कोसळला, पण नेमके कुठे हे ठाऊक नव्हते. शोध चालू असतानाच त्याची दुचाकी शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील दरीत घसरल्याचे बोरघाट पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिथे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम रेस्क्युसाठी पोहोचली. त्यांना 50 फुटांवर दुचाकी दिसून आली. मात्र, अक्षय त्याहून खोल 250 फुट दरीत होता. त्यामुळे पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेसोबत शिवदुर्ग मित्र लोणावळा, महामार्गावरील देवदूत टीम आणि खोपोली फायर ब्रिगेडला पाचारण केले. सर्वांनी साधारण चार तासांच्या अथक प्रयत्नाअंती अत्यंत साहसाने अक्षयला खोल दरीतून सुखरूप वर काढले व उपचारासाठी पनवेल येथे रवाना केले. अक्षयची दुचाकी देखील वर खेचण्यात आली आणि खोपोली पोलिसांनी तिचा ताबा घेतला.


शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि देवदूत टीमचे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी कौतुक केले.

Exit mobile version