कसोटी क्रिकेटचा थरार 22 नोव्हेंबरपासून

बॉर्डर-गावस्कर चषकामध्ये पाच सामने खेळले जाणार

| सिडनी । वृत्तसंस्था ।

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 32 वर्षांनंतर या दोन देशांदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी 1991-92 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. गेल्या दोन हंगामांपासून सातत्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार्‍या टीम इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मंगळवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी वर्षासाठी त्यांच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चीही घोषणा करण्यात आली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर पोस्ट केले, 1991-92 नंतर प्रथमच, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका या उन्हाळ्यात खेळली जाईल. ही मालिका 2024-25 च्या देशांतर्गत वेळापत्रकाचे मुख्य आकर्षण असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, बीसीसीआय कसोटी क्रिकेटचा समृद्ध वारसा जपण्यासाठी समर्पित आहे. हे असं स्वरूप आहे ज्याचा आम्ही सर्वात जास्त आदर करतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पाच कसोटी सामन्यांपर्यंत वाढवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतचे आमचे सहकार्य हे कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यासाठी आमची सामूहिक बांधिलकी दर्शवते. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जाऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेयर्ड म्हणाले, या दोन देशांमधील तीव्र स्पर्धा पाहता, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आता पाच कसोटी सामन्यांपर्यंत करण्यात आल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.

आतापर्यंत एकूण 16 वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलेय. यापैकी टीम इंडियाने 10 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर कांगारू केवळ 5 वेळा ही ट्रॉफी जिंकले आहेत. 2003-04 मध्ये एकदा ही मालिका अनिर्णित राहिली होती. गेल्या पाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपैकी भारताने सलग चार मालिका जिंकल्या आहेत. यापैकी दोन वेळा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. आता पुन्हा एकदा 17 वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात होणार आहे. यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात येणार असून मालिकेत एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील. मालिका 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.

2020-2021 दरम्यान भारतीय संघ शेवटचा ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर गेला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये 4 कसोटी सामने, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले गेले होते. कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांनी विजय मिळवला होता. दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत 8 गडी राखून विजय मिळवला. तिसरा सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता आली असती, मात्र ऋषभ पंतच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला आणि मालिका खिशात घातली.

बॉर्डर गावस्कर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, अ‍ॅडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
Exit mobile version