। रायगड । खास प्रतिनिधी ।
कार्ला गड येथील एकवीरा आईच्या मानाच्या पालखी सोहळ्यानिमित्त चौल-आग्राव येथे शिडहोडी (बोट) शर्यतींचा थरार पहायला मिळणार आहे. या स्पर्धा सोमवारी (दि.31) रेवदंडा खाडीत रंगणार आहेत. शर्यत अग्रावजेट्टी येथून सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहेत.
या आगळ्यावेगळ्या पारंपारिक बोट शर्यतीसाठी अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यातील असंख्य प्रेक्षकवर्ग तसेच मुंबई पुण्यातील पर्यटकदेखील उपस्थित राहतात. यावर्षी आठ ते नऊ स्पर्धक बोटींचा थरार पाहायला मिळणार आहे. प्रथम येणार्या तीन बोटींना अनुक्रमे 75 हजार रुपये, 51 हजार रुपये आणि 31 हजार रुपये अशी भव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बोटीचे उत्कृष्ट नाखवा व तांडेल यांनादेखील बक्षिसे देण्यात येणार आहेत. या बोट शर्यतींचा थरार प्रत्यक्ष समुद्रात बोटींवर जाऊन घेता येणार आहे. तसेच, अग्रावजेट्टी व रेवदंडा पुलावरूनदेखील थरार पाहता येणार आहे.
यादरम्यान, बोट शर्यतीसह कोळीगीतांचे सुप्रसिद्ध गायक योगेश आग्रावकर यांच्या नवीन कोळीगीतांचा संगीत कार्यक्रमाचादेखील आस्वाद घेता येणार आहे. या आगळ्यावेगळ्या शिडहोडी शर्यतीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शर्यतीचे आयोजक दर्यासागर मित्र मंडळाचे अध्यक्ष गोरख डोयले, उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे.