युरो फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून

पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीची गाठ स्कॉटलंडशी

। म्युनिक (जर्मनी) । वृत्तसंस्था ।

फुटबॉल विश्‍वातील दुसरी लोकप्रिय युरो चषक स्पर्धा जर्मनीत सुरू होणार आहे. जर्मनी प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी पश्‍चिम जर्मनीने 1988 मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करताना जर्मनीसमोर पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचे आव्हान राहणर आहे.

स्पर्धेच्या स्वरूपात अनेक बदल झाल्यापासून केवळ तिसर्‍यांदा या स्पर्धेत 24 संघ सहभागी होणार आहेत. क्लब फुटबॉल स्पर्धेचा हंगाम संपला असून, आता फुटबॉल प्रेमींचे लक्ष 17व्या युरो स्पर्धेकडे राहणार आहे. यजमान जर्मनी आणि स्पेनने तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. गतविजेते इटली आणि 2018 मधील विश्‍वचषक विजेते फ्रान्स यांनी दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून, या स्पर्धेतून जॉर्जिया पदार्पण करणार आहे. 15 जूनपासून एक महिनाभर फुटबॉलपटूंचा 90 मिनिटांचा पदन्यास जगभरातील फुटबॉल चाहत्यांना खिळवून ठेवणार आहे.

जर्मनी विजयी सुरुवातीसाठी उत्सुक यापूर्वी काय घडले हे विसरून जर्मनी घरच्या मैदानावर विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्यात आतापर्यंत 13 सामने झाले असून, स्कॉटलंडने केवळ एकच जिंकला आहे. आम्ही केवळ चर्चा करायला आलेलो नाही. पूर्वी काय घडले यापेक्षा या वेळी काय घडणार आहे हे महत्त्वाचे. आम्ही अनेक चढ-उतार बघितले आहेत. पण, मोठ्या स्पर्धेत उतरल्यावर सुरुवात यशस्वी होणे केव्हाही चांगले. आमच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, असे जर्मनीचा बचावपटू अँटोनियो रुडिगरने सांगितले.

या स्पर्धेला विशेष महत्त्व असते. अपेक्षा खूप असतात. संपूर्ण जगाचे युरोपियन देशांच्या कामगिरीकडे लक्ष असते. आमची गेल्या काही स्पर्धेतील कामगिरी चांगली नाही, पण या वेळी आम्ही विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहोत, असे जर्मनीचे प्रशिक्षक ज्युलियन नागेल्सन म्हणाले. जर्मनी एक सर्वोत्तम संघ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सामन्यांच्या त्यांना अनुभव आहे. अशा मोठ्या स्पर्धात जर्मनीसारखे तगडे संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवत असतात, असे स्कॉटलंडचा आक्रमक खेळाडू रायन क्रिस्टी म्हणाला.

Exit mobile version