जिजाऊ केसरी महिलांच्या कुस्तीचा थरार

कऱ्हाडच्या वेदांतिका पवारवर मात; कोल्हापूरच्या सृष्टीने मारले मैदान

| कोरेगाव | प्रतिनिधी |

कोरेगाव येथील हुतात्मा स्मारकात जिजाऊ केसरी महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कुस्त्यांच्या मैदानातील खुल्या गटात कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेने कऱ्हाडच्या वेदांतिका पवारवर मात करत प्रथम क्रमांक मिळवत जिजाऊ केसरी किताब तथा मानाची गदा देखील पटकावली आहे.

माँ साहेब जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ महोत्सव समितीच्यावतीने सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने प्रथमच जिजाऊ केसरी महिला कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. आंतरराष्ट्रीय पैलवान भरत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कोमल गोळे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या मैदानात 22 ते 65 किलोपर्यंत 10 वजन गट व 1 खुला अशा 11 गटात कुस्त्या पार पडल्या. या स्पर्धेत साताऱ्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर व सोलापूर आदी जिल्ह्यांतील सुमारे दीडशेवर महिला पैलवान सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मैदानातील खुली व प्रथम क्रमांकाची कुस्ती सृष्टी भोसले व वेदांतिका पवार यांच्यातील कुस्ती चुरशीने झाली. गुणांच्या जोरावर तृप्ती भोसलेने वेदांतिका पवारवर मात करत अर्चना बर्गे यांनी पुरस्कृत केलेले 11 हजार रुपये रोख बक्षीस व जिजाऊ केसरीची गदा पटकावली. तर, उपविजेत्या वेदांतिका पवार हिला 7 हजार रुपये आणि तृतीय हिंदवी घोरपडे (इंदापूर) हिला 3 हजार रुपये रोख बक्षीस व चषक प्रदान करण्यात आली. सर्व विजेत्यांना कोरेगाव इनरव्हील क्लब व रमेश उबाळे यांच्यावतीने पारितोषिके देण्यात आले. यावेळी मैदानात पंच म्हणून राष्ट्रीय पंच राजेंद्र कणसे, जितेंद्र कणसे, अमर कणसे, ओंकार कणसे, सागर काळे, अरविंद निकम, अनिकेत काळे, प्रेम किर्दत यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे समालोचन रोहन केंजळे यांनी केले. मैदानाच्या यशस्वितेसाठी जिजाऊ महोत्सव समिती, कुस्तीप्रेमी, शौकिनांनी परिश्रम घेतले.

वजन गटनिहाय विजेते, उपविजेती
22 किलो : रुचा पाटील (पन्हाळा) व सई कोंडावळे (खामकरवाडी)
25 किलो : आराध्या तांबे (वाखारी) व भाग्यश्री वायदंडे (सासुर्वे)
30 किलो (15 वर्षांखालील) : समृद्धी सावंत व श्रावणी शिंदे
30 किलो (11 वर्षांखालील) ः सृष्टी राजीवडे व स्वरा कदम
35 किलो : शामल चव्हाण (म्हसवड) व वैष्णवी कोळी (इंदापूर)
40 किलो : वैष्णवी ढेकळे (वाखरी) व जान्हवी माने (शिरढोण)
45 किलो : अमृता शिंदे ( बारामती) व भारती पाटेकर (बेडग)
50 किलो : तनुजा माळी (बेडग) व अनुष्का हास्पे (सोमंथळी)
60 किलो : साक्षी पाटील (चाफळ) व साक्षी धुमाळ (मरडे)
65 किलो : ऋतुजा गाडवे (पुणे) व शर्वरी राठोड (सातारा)
Exit mobile version