। उरण । वार्ताहर ।
पालघरमधील झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पंधरा हजारांपेक्षाही जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासमोर बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपस्थित महिलांना कोकण पट्ट्यात नवं जग घडवण्याचं आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटानं प्रतिसाद दिला.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे महिलादिनानिमित्त आयोजित भव्य दिव्य सोहळा ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून 15 हजार महिलांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणार्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आशाताई, परिचारिका, डॉक्टर, पोलिस व स्वयंरोजगार करणार्या महिला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या मेळाव्यासाठी अॅड. हेमांगी दत्तात्रय पाठारे, अॅड. शबनम काझी आणि अॅड. सुजाता जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.