| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खो-खो खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंची गुणवत्ता राज्य व जिल्हास्तरावर अधोरेखित व्हावी, या उद्देशाने रोहा खो-खो प्रीमियर लीग 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही लीग जय बजरंग क्रीडा मंडळ, रोहा व एस.एन.एस. स्पोर्ट्स क्लब, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, या स्पर्धेस रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन तसेच रोहा तालुका खो-खो असोसिएशन यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे, त्यामुळे ही लीग अधिकृत नियमांनुसार व नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. नुकतीच माजी आमदार अनिकेत तटकरे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व अध्यक्ष रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन) यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान प्रस्तावित खो-खो लीगसाठी आवश्यक मार्गदर्शनासह अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे लीगचे आयोजन नियोजित वेळेत, शिस्तबद्ध व नियमबद्ध पद्धतीने पार पडणार असून, ही स्पर्धा शनिवार दि. 24 व रविवार दि. 25 जानेवारी रोजी श्री.धावीर महाराज क्रीडा नगरी, मेढा, ता. रोहा येथे आयोजित करण्यात येणार आहे. या लीगमध्ये पुरुषांचे 8 संघ व महिलांचे 2 संघ सहभागी होणार असून, पुरुष विभागासाठी खेळाडूंची संघ बांधणी लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. सदर खेळाडू लिलाव प्रक्रिया गुरुवार दि. 15 जानेवारी रोजी पार पडणार असून, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या लीगमध्ये राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर खेळलेले अनुभवी खेळाडू तसेच नवोदित खेळाडू सहभागी होणार असून, त्यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार, वेगवान व रोमांचक खो-खो सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. लीगच्या यशस्वी आयोजनासाठी मैदान तयारी, पंच व्यवस्था, शिस्त समिती व लिलाव समिती कार्यरत असून, सर्व खेळाडूंचा विमा काढण्याचा निर्णयही आयोजकांनी घेतला आहे. या स्पर्धेमुळे रोहा तालुक्यातील खो-खो चळवळीला नवे बळ मिळणार असून, तरुण खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोहा खो-खो प्रीमियर लीग 2026 चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







