उद्यापासुन रंगणार टी-20 विश्‍वचषकाचा थरार

क्रिकेट रसिकांना मिळणार मोठी मेजवानी

। न्युयॉर्क । वार्ताहर ।

देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचलेली असतानाच अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये ‘ट्वेन्टी-20’ विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे नगारे भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी सहा वाजता वाजणार आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय संघाबाबतच्या आशा फेर धरणार आहेत. तब्बल 20 देश, 29 दिवस, 55 लढती अशी मोठी मेजवानी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. सर्वप्रथम प्रत्येकी पाच संघ असलेले चार गट त्यांच्यात होणारे साखळी सामने त्यानंतर अव्वल आठ संघात ‘सुपर-8’ असे स्पर्धेचे स्वरूप आहे. यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.

सर्वांना प्रतीक्षा असलेली भारत-पाकिस्तान सामना नऊ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी मायदेशात भारतीय संघाचे हातातोंडाशी आलेले एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. आता तरी ‘आयसीसी’चा विश्‍वकरंडक उंचावणार का, याची उत्सुकता आहे. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर भारताला प्रत्येकवेळी हुलकावणी मिळालेली आहे. यावेळी अमेरीकेने पहिल्यांदाच तर वेस्ट इंडिजने दुसर्‍यांदा विश्‍वचषकाचे यजमानपद स्विकारले आहे. दोन जून रोजी या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल, तर 29 जून रोजी स्पर्धेचा जेता ठरणार आहे.

29 जूनला अंतिम लढत
साखळीतील प्रत्येक गटातील सर्वोत्तम दोन संघ 'सुपर-8' फेरीसाठी पात्र हातील. 'सुपर-8' फेरीत आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून 'सुपर-8' फेरीमधील प्रत्येक गटातील अव्वल दोन देश उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. तसेच, 27 जूनला उपांत्य फेरीच्या लढती होऊन 29 जूनला अंतिम लढत होईल.
भारतीय संघाचे सामने
प्रत्येक गटात पाच देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय संघ 5 जून रोजी न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्‍वचषकाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमांचक सामना होईल. वरील तीन व्यतिरिक्त सह-यजमान यूएसए आणि कॅनडा हे गट अ मध्ये इतर दोन सदस्य आहेत.
येथे पाहता येतील सामने
भारतीय वेळेनुसार हे सामने रात्री असतील. संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक केली जाईल. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. नाणेफेकीनंतर अर्ध्या तासाने म्हणजेच रात्री 8.00 वाजता सामना सुरु होईल. तसेचव, हे सामने कुठे पाहायला मिळणार, हे सर्वात महत्वाचे आहे. विश्‍वचषकाचे सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर ऑनलईन सामने पाहायचे असतील तर त्यासाठी हॉटस्टारवर चाहत्यांना जावे लागेल.
Exit mobile version