उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित , भारतचा सामना दक्षिणआफ्रिकेबरोबर
| मुंबई | वृत्तसंस्था |
19 वर्षाखालील विश्वचषक 2024 स्पर्धेचा थरार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. साखळी फेरी पार पडल्यानंतर शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी सुपर 6 फेरीतील अखेरचा सामना पार पडला आणि सेमी फायनलसाठी 4 संघ अखेर निश्चित झाले. आता या 4 संघांमध्ये एका चषकासाठी चांगलीच रस्सीखेच आणि चढाओढ पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशवर 5 धावांनी थरारक विजय मिळवला. पाकिस्तान यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्याआधी भारत , दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
युवा विश्वचषक 2024 मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना हा मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तर दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्यात भारताला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
दरम्यान भारतीय युवा संघाने या स्पर्धेत उदय सहारन याच्या नेतृत्वात सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीत सलग 3 आणि त्यानंतर सुपर 6 मध्ये दोन्ही सामन्यात विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने हे पाचही सामने धावांनी जिंकले आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीत अनुक्रमे बांगलादेश, आयर्लंड आणि यूनाटेड स्टेटसचा धुव्वा उडवला. तर त्यानंतर सुपर 6 मध्ये न्यूझीलंड आणि त्यानंतर नेपाळला पराभूत केलं.
भारतीय संघाचे युवा शतकवीर
भारताच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. मुशीर खान याने आयर्लंड विरुद्ध 118 धावांची खेळी केली. त्यानंतर यूनायटेड स्टेटस विरुद्ध सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने शतक झळकावलं. पुन्हा मुशीर खान याने शतकी खेळी करत 131 धावा केल्या. मुशीरने न्यूझीलंड विरुद्ध हा धमाका केला. त्यानंतर बीडच्या सचिन धस आणि उदय सहारन या जोडीने नेपाळ विरुद्ध शतकी खेळी केली. सचिनने 116 आणि उदयने 100 धावा केल्या.
युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ
उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.