पाणवठ्यांअभावी पशु, पक्ष्यांना पाण्यासाठी करावी लागणार वणवण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वनांमधील पशु, पक्ष्यांचे संरक्षण व संर्वधन करण्यासाठी वन विभाग वेगवेगळ्या पध्दतीने उपाययोजना करतात. मात्र, वन विभागाच्या उदासीनतेमुळे ऐन उन्हाळ्यात जंगलातील प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येण्याची भिती निर्माण झाली आहे. पाणवठे तयार करण्यासाठी यावर्षी प्रयत्नच केले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बांधण्यात आलेल्या पाणवठ्यांची अवस्था दयनीय झाली असून, त्यांची दुरुस्तीदेखील केली नाही. पाणवठ्यांअभावी पशु, पक्ष्यांना पाण्याची चिंता भेडसावणार आहे.
मागील वर्षी वन विभागाने मोठा गाजावाजा करीत उन्हाळ्यात जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून काढले. जंगलातील प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हा प्रयत्न वन विभागाने केला होता. जंगलातील पाणवठे स्वच्छ करून ते पशुपक्ष्यांसाठी खुले करण्यात आले. अलिबागसह, सुधागड अशा अनेक भागात जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वर्षी वन विभागाने पाण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे.
जंगलामध्ये भेकरसह ससा, तरस या प्राण्यांसह पाणकावळा, बगळा या सारखे अनेक पशु, पक्ष्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये धरणे असल्याने त्याचा आधार जंगलातील प्राण्यांना होत आला आहे. परंतु, वन विभागाने जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे बांधले नसल्याने पशु, पक्ष्यांना पाण्यासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ येणार आहे. जंगलातील प्राणी, पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. पक्षी व प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होण्याबरोबरच त्यांचा जीव कासावीस होण्याची भीती अधिक आहे.
पाणवठे ठेकेदारांच्या सोयीनुसार
पाणवठे झर्याच्या ठिकाणी न बांधता, संबंधित ठेकेदारांनी त्यांच्या सोयीनुसार पाणवठे बांधले आहेत. त्यामुळे पावसाळा वगळता अन्य हंगामात या पाणवठ्यामध्ये पाणीच शिल्लक राहत नाही. उन्हाळ्यात जंगली पशु, पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हा प्रयत्न केला होता. त्यामुळे पाणवठे नक्की बांधण्याचा हेतू काय होता असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बांधलेले पाणवठे दुर्लक्षित
महाजने, मोरोंडे या भागात काही वर्षापूर्वी पाणवठे बांधण्यात आले. या पाठवठ्यांद्वारे जंगलातील प्राण्यांना पाण्याचा आधार देण्याचा प्रयत्न वन विभागाने केला. हा प्रयत्न फेल ठरल्याचे चित्र आहे. महाजने येथील सर्वे नंबर 50, 53, तसेच मोरोंडे येथील 35 सेक्शन अंतर्गत येणार्या जागेत पाणवठे बांधण्यात आले आहेत. मात्र या पाणवठ्यांमध्ये पाणीच साचले जात नसल्याची माहितीसमोर येत आहे. पाणवठ्यांसाठी वन विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च केला. त्यामुळे उपवन संरक्षक राहुल पाटील यांनी या बांधकामाबाबत माहिती घेऊन संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी काही मंडळींकडून होत आहे.
जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत शोधून ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न होत असताना, वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या मदतीने जंगलात पाणवठे अथवा, अन्य पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आहे.
राहुल पाटील
उपवनसंरक्षक अलिबाग