अरे बापरे! नेरळमधील चक्क स्वच्छतागृह गेले चोरीला

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ मुख्य बाजारपेठेतील डॉ. कर्वे यांच्या क्लिनिकजवळील गल्लीत ग्रामपंचायत मार्फत ठेवण्यात आलेले स्वच्छतागृह चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे. बाजारहाट करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांची स्वछतागृहा अभावी होणारी कुचंबणा लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीने ही स्वच्छतागृहाची सोय केली होती. परंतु ते स्वच्छतागृह गेले दोन दिवस झाले जागेवर दिसून येत नसल्याने त्याची चोरी झाली असल्याची चर्चा सध्या नेरळ शहरात पसरली आहे.

नेरळ शिवसेना शाखेसमोर असलेले 40 वर्षे जुने सार्वजनिक स्वच्छतागृह काही नागरिकांच्या हितासाठी पाडण्यात आले. कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नेरळ बाजारपेठ ओळखली जाते. बाजारहाट करण्यासाठी तालुक्यातून सर्व ठिकाणावरील नागरिक येथे येतात. येथे येणार्‍या महिला वर्ग तसेच आदिवासी महिला लांबून येत असल्याने स्वछतागृहा अभावी त्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता स्वच्छतागृह बांधण्यात आले होते.

कोरोनाच्या काळात स्वच्छतागृह नेरळ ग्रामपंचायतीकडून काही स्थानिक रहिवासी असलेल्या धनिकांसाठी पाडण्यात आल्याचे समोर आले होते. याबाबत माध्यमातून टिका आणि नागरिकांची होणारी गैरसोय यावर बातमी प्रसारित झाल्यावर स्वच्छतागृह ग्रामपंचायतीच्या माध्यमातून क्लिनिकजवळील गल्लीत ठेवण्यात आले. मात्र गेले दोन दिवस स्वच्छतागृह जागेवर दिसत नसून, स्थानिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायत याकडे लक्ष देणार का..? चोरीला गेलेल्या स्वच्छतागृहाचा शोध घेणार का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक लोकांच्या तक्रारी असल्याने ग्रामपंचायतच्या आदेशाने स्वच्छतागृह तात्पुरत्या स्वरूपात उचलून नेेण्यात आले आहे.

गणेश गायकर-ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version