ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त भावूक
। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त भावूक झाले आहेत. याप्रसंगी चित्रसृष्टीचा सूर हरवला, अशा शब्दांत आपले दुःख व्यक्त करत, आपल्या आयुष्याती एक प्रसंग सांगितला आहे.
राजदत्त म्हणतात की, मधुचंद्र हा माझा सिनेमा खूप गाजला आणि मी त्या यशाच्या मस्तीत होतो. पण त्यानंतर सात महिने मला कामच नव्हते. मी मद्रासला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो सुलोचनाबाईना सांगितला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी भालजी पेंढारकर यांच्याकडे शब्द टाकला.
मी भालजीना भेटायला गेलो. त्यांनी मला असिस्टंट म्हणून कामास ठेवण्यास नकार दिला. पण त्यानंतर मला एक सिनेमा त्यांनी दिला आणि त्याच सिनेमाला पुढे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याबरोबर मी कोल्हापूर गाठले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते म्हणाले, अरे माझे नाही लतादिदींचे आशीर्वाद घे. कारण त्यांच्यामुळे तुला हा सिनेमा मी दिला.
तेव्हा माझ्या लक्षात आले की , मी काम मागण्यास गेलो तेव्हा लतादीदी तिथे होत्या. मी कोल्हापूरवरून मुंबईला थेट त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. मी योग्य आणि चांगल्या मुलाला मी काम द्यायला सांगितले याचा मला आनंद असल्याचे म्हणत त्यांनी माझे कौतुक केले.
पुढे हा जिव्हाळा वाढत गेला. आज त्यांच्या निधनाची बातमी आली असून इतकेच सांगेन की असा निरागसपणा, सात्विकता पुन्हा कधी दिसणार नाही.संपूर्ण चित्रपटसृष्टीचा सूर आज हरवला आहे, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.