बाह्यवळण मार्गाला मिळेना मुहूर्त; अपघातांच्या प्रमाणात झाली वाढ
| पाली | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेला बाह्यवळण मार्ग (बायपास) अद्याप पूर्ण न झाल्याने भाविक, पर्यटक, प्रवासी आणि स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यातून अवजड वाहने काढताना चालकांची मोठी कसरत होत असून, या कोंडीमुळे शहराचा श्वास गुदमरत आहे.
पाली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. शहरातील बल्लाळेश्वर मंदिर परिसर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टॅण्ड, गांधी चौक आणि बाजारपेठ यांसारख्या अरुंद रस्त्यांवर नियमित कोंडी होते. डबर व खडी वाहतूक करणारे अवजड डंपर, नियमांचे उल्लंघन करून होणारी दुहेरी वाहतूक आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली अवैध पार्किंग यामुळे ही समस्या अधिकच जटील झाली आहे. अनेकदा महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने कोंडीत भर पडते, ज्याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक कोंडीत अडकलेले असताना एका डंपरमुळे ग्रामविकास अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना ही येथे घडली आहे.
15 वर्षांपासूनचा वनवास
पालीतील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून 15 वर्षे उलटली आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (ए) ला पाली-पाटणूस मार्गाशी जोडणारा हा रस्ता बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावापर्यंत जाणार आहे. यासाठी 18 कोटी रुपये रस्त्यासाठी आणि 10 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे आणि जमिनीचा मोबदला योग्य न मिळाल्याने शेतकऱ्यांचा विरोध असल्याने हे काम अद्याप कागदावरच आहे.
वाहतुकीचा ताण
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी व संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे मुंबईकडून कोकणात जाणारी आणि कोकणातून पुण्या-मुंबईकडे येणारी बहुतांश वाहतूक पालीमार्गे वळवली जाते. यामुळे तीर्थक्षेत्रातील मूळ वाहतुकीत बाहेरच्या वाहनांची मोठी भर पडत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास ही वाहने तसेच अवजड वाहने शहराबाहेरून जातील आणि पालीचा रस्ता मोकळा होईल.
पालीतील अरुंद रस्ते, अतिक्रमणे, दुतर्फा पार्क केलेली वाहने व नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक आणि महत्त्वाचे म्हणजे सतत होणारी अवजड वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. पोलिसांनी योग्य प्रकारे वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नगरपंचायत ने रस्त्यावर आलेली अनधिकृत बांधकामे तोडली पाहिजेत. शिवाय बाह्यवळण मार्ग झाल्यास वाहने थेट शहरा बाहेरून जातील आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आपोआप मार्गी लागेल.
-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली






