माणगावातील वाहतूक कोंडी सुटणार!

पोलिसांकडून बाजारपेठेची पाहणी
। माणगाव । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवा दरम्यान माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात गणेशभक्त मुंबईहुन कोकण व तळ कोकणात जातात. त्या अनुषंगाने चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, नगराध्यक्ष, वाहतुक पोलीस या सर्वांनी मिळून उपाययोजना आखण्यासाठी माणगाव बाजारपेठेतील रस्त्याची पाहणी केली.

माणगावमध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ असल्याने स्थानिकांची खरेदीसाठी कायमच गर्दी असते. तसेच शहरातच बसस्थानक असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे गणेशोत्सवातील गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून या मार्गावर वाहने पार्किंग न करता अन्य ठिकाणी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गालगत गटाराच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या हातगाड्या हटविण्यात येणार आहेत. रस्त्यालगत खोदलेले नाले, गटारे भरण्याच्या सुचना नगरपंचायतीला देण्यात आल्या आहेत.

मुंबई बाजूकडून येणार्‍या परिवहन बससाठी एमआरएफ टायर शोरूमसमोर बस स्थानक असणार आहे. जेणेकरून बाजारपेठेत वाहतुक कोंडी होणार नाही. तसेच बाजारपेठेतील रिक्षा स्थानकात एकच रिक्षा उभी असणार असून उर्वरित रिक्षा बाजूला असणार आहेत. नंबर आल्यानंतर एक-एक रिक्षा प्रवाशांसाठी उभी राहील. महामार्गावर तसेच पर्यायी मार्गावर जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. बाजारपेठेत 10 ते 15 वाहतूक पोलीस व प्रत्येक नाक्यावर 20 ते 25 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. खरेदी करण्यास येणार्‍या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या कालावधीत बाजारपेठेत अनधिकृत पार्किंग केल्यास वाहनचालकावर कारवाई केली जाणार आहे. कचेरी, मोर्बा, निजामपूर व महामार्गावरील मुख्य बाजारपेठेत फुटपाथवरून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांना त्रास होणार नाही, याची काळजी फेरीवाले, हातगाड्या व्यावसायिकांनी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version