सहा चिमुरडे आणि एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत


मालवणी इमारत दुर्घटनेने मुंबई हळहळली
मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग बुधवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकाच कुटुंबातील सहा मुलांसह नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या एक मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रात्रभर शोधकार्य सुरू होते. या चाळीत राहणार्‍या राफिक यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील सहा चिमुरडे ढिगाराखाली सापडले. तर, राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाराखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. राफिक यांच्या कुटुंबातील सहा चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एकूण नऊ जणांचा या दुर्घटनेमध्ये करुण अंत झाला.

मृतांमध्ये साहिल सर्फराज सय्यद वय 9 वर्ष, तर अरिफा शेख या 8 वर्षांच्या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर 3 आणि 5 वर्षांच्या चिमुरडीचा सुद्धा यात समावेश आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जण हे राफिक यांच्या कुटुंबातील होते.

या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

केंद्राकडून दोन, तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत
मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला, तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.

दोघांवर गुन्हा दाखल
मालवणी भागातील इमारत दुर्घटनेप्रकरणी रफीक सिद्दीकी आणि रमजान शेख या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली.

Exit mobile version