अखेर वाहतूकदारांचा संप मिटला; इंधनपुरवठा होणार सुरळीत

| मुंबई | प्रतिनिधी |

नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतूदींबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने वाहतुकदारांनी मंगळवारी रात्री संप मागे घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान या संपाचा फटका वाशी येथील एपीएमसी मार्केटला बसला आहे. गेल्या दोन दिवसांत येथे भाजीपाल्यांची आवक घटली आहे. परिणामी मुंबईतील भाजीपाल्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले. ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आपला संप मागे घेतला. रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला एपीएमसी बाजारात पाठवला नसल्याने आवक मोठ्या प्रमाणावर घसरली.

एपीएमसीत मंगळवारी दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते. बुधवारी तशीच परिस्थिती दिसून आली. दरम्यान भाजीपाल्यांची आवक घटल्याने दर 30 ते 40 टक्क्यांनी वधारलेचे चित्र एपीएमसीत आहे.

Exit mobile version