। खांब-रोहे । प्रतिनिधी ।
रोहे तालुक्यातील धानकान्हे आदिवासीवाडी येथील राहत्या घरावर विद्युत पोल कोसळलल्याची घटना घडली. सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर धानकान्हे रहिवासी असणारे रंजन जाधव यांच्या घरावर विद्युत पोल कोसळला तर संतोष जाधव यांच्या घरावर घराशेजारील एक मोठे झाड कोसळले आहे. या दुर्घटनेत रंजन जाधव व संतोष जाधव यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटेनेमुळे रंजन जाधव व संतोष जाधव यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात घरे नादुरुस्त झाल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही दुर्घटनांची माहिती मिळताच सरपंच वसंत भोईर, उपसरपंच सूरज कचरे, सामाजिक कार्यकर्ते पा़डुरंग गोसावी व ग्राम विकास अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शासकीय स्तरावर पंचनामे करून शासनाकडून लवकरात लवकर व अधिकाधिक नुकसान भरपाई कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.