‘काला घोडा’ आर्ट फेस्टिव्हलची सहल; विविध कलांचे प्रत्यक्ष दर्शन
| नेरळ | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत पोशीर हद्दीतील वारे -चिंचवाडी येथील ठाकर आदिवासी वाडीत सुरू असलेल्या ‘वडाखालच्या शाळे’च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांपलीकडचे जग अनुभवता यावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि आत्मविश्वास बळकट व्हावा, या उद्देशाने मुंबईत भरवण्यात आलेल्या ‘कालाघोडा आर्ट फेस्टिव्हल 2026’ला नेण्यात आले. या चार दिवसांच्या शैक्षणिक सहलीमुळे आदिवासी भागातील मुलांसाठी शिकण्याचे नवे दालन खुले झाले.
31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा परिसरात भरवण्यात येणारा हा कला महोत्सव आशिया खंडातील सर्वात मोठ्या कला महोत्सवांपैकी एक मानला जातो. दरवर्षी येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार सहभागी होतात. चित्रकला, शिल्पकला, नाटक, नृत्य, संगीत, साहित्य, हस्तकला, छायाचित्रण, कार्यशाळा, बालकलाकारांसाठी विशेष उपक्रम अशा तब्बल 500 हून अधिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कला आणि संस्कृतीचा भव्य आविष्कार येथे अनुभवता येतो. या महोत्सवात सहभागी झालेल्या वडाखालच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विविध प्रकारच्या कलांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. रंगीबेरंगी चित्रप्रदर्शने, जिवंत शिल्पकला, रस्त्यावरील नाट्यप्रयोग, लोकनृत्य, संगीत मैफिली आणि सहभागी कार्यशाळांमधून मुलांना आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळाली. कला ही केवळ पाहण्याची गोष्ट नसून, ती अनुभवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे, हे या मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून उमगले.
ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांसाठी असा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. विविध संस्कृती, वेगवेगळ्या विचारधारा आणि अभिव्यक्तीचे प्रकार जवळून पाहिल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली. आपणही काहीतरी वेगळं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या मनात रुजला. अनेक मुलांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कला आणि संस्कृतीचा अनुभव घेतल्याने त्यांच्यात कुतूहल, उत्सुकता आणि शिकण्याची ओढ वाढल्याचे दिसून आले. या निमित्ताने वडाखालच्या शाळेतील मुलांना चार दिवस छोट्या गटांमध्ये मुंबईला नेण्यात आले. या प्रवासात केवळ कला महोत्सवच नव्हे, तर महानगरातील जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही त्यांना मिळाली. अनेक मुलांनी पहिल्यांदाच समुद्र पाहिला, स्वतः तिकीट काढून मेट्रोतून प्रवास केला, डबल डेकर बेस्ट बसमध्ये बसले.
यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेला आतून भेट देत देशाची आर्थिक व्यवस्था समजून घेतली. दूरून का होईना मंत्रालय, विधान भवन आणि महानगरपालिका पाहून प्रशासनाची रचना आणि कामकाजाची माहिती मिळाली. ही सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी, शहर, व्यवस्था आणि व्यापक जग समजून घेण्याची शिकवण देणारी ठरली.







