चार गावाचा संपर्क धोक्यात; धोक्याची पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष वाहतूक संकटात
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील नदीवरील सुमारे 45 ते 50 फूट लांबीचा जीर्ण व धोकादायक पूल बुधवारी सकाळी पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खचला. पुलाच्या बाजूच्या संरक्षक भिंती, खांब तसेच तळभाग मोठ्या प्रमाणात खचले असून, पुलाच्या संरचनेला मोठे तडे गेले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पुलाची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रुप ग्रामपंचायत तुकसईने जिल्हा परिषदेकडे अनेकदा पत्रव्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पुलाखालून जात होता. अखेर पाण्याचा वाढता प्रवाह आणि पुलाची जीर्ण अवस्था यामुळे पूल खचला.
या पुलावरून तुकसई गावासह तूरमाल ठाकूरवाडी, चिंबोडे ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडीतील नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, कामगार, नोकरदार तसेच आठवडे बाजारासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग होता. पूल खचल्याने नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून दुरुस्तीसाठी आवश्यक निधी अपुरा पडल्याने काम रखडल्याचे सांगण्यात येते. पुलाची धोकादायक अवस्था लक्षात घेऊन अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तसेच याठिकाणी धोकादायक पुलाचा फलकही लावण्यात आला होता. पूल खचल्यानंतर जिल्हा परिषद अभियंत्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, वेळेत काम न झाल्याने अखेर ही परिस्थिती निर्माण झाली.
गणेश मोरे,
ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत दुरशेत
तुकसई येथील हा पूल सुमारे तीस वर्षे जुना असून, तो जीर्ण झाला होता. पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत अनेक ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला; मात्र नियोजित वेळेत काम न झाल्याने अखेर पूल खचला. पावसाळ्यामध्ये या मार्गावरून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे सातत्याने येथे असलेल्या खांबांना यांचा फटका बसत होता. अखेर आज सकाळी हा पूल खचला.
ग्रामस्थ, तुकसई
