रायगड जिल्ह्या बर्फाने अच्छादला
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शहरे आणि गावे बर्फाने अच्छादित झाल्यासारखे दिसणारे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘काश्मीर नाही अलिबाग’, ‘स्नो फॉल इन पाली’ आणि ‘रायगड हिमाच्छादित’ अशा मथळ्यांखाली हे व्हिडीओ व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून लोक अचंबित होत आहेत.
एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये स्थानिक शहरे व गावे जाड बर्फाच्या आवरणाने झाकली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय बर्फ पडतानाही दिसत आहे. वास्तवात रायगड जिल्ह्यात कुठेही अशी बर्फवृष्टी होत नसली, तरी एआयच्या मदतीने कल्पनेच्या जगात हे दृश्य साकारण्यात आले आहे. स्थानिकांपैकी कोणीतरी त्या-त्या शहरातील व गावातील सर्व ठिकाणचा व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर त्यामध्ये एआयद्वारे बर्फवृष्टी दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये सुरेल पार्श्वसंगीत आणि निर्मित कथानकामुळे दृश्य आणखीच जिवंत झाले आहे. इतरही काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे एआय व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
तंत्रज्ञान व कलेचा मिलाफ
तंत्रज्ञानाचा वापर करून कलात्मक आणि मनोरंजक सामग्री निर्माण करता येते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कल्पनेच्या जगातील दृश्य डिजिटल पद्धतीने साकारण्याची ही एक नवीन संकल्पना आहे. यामुळे तरुण पिढीमध्ये एआय तंत्रज्ञानाबद्दल रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे मत काही शिक्षक तंत्रज्ञान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सावधगिरीची गरज
पालीतील संगणक तज्ज्ञ योगेश सुरावकर यांनी सांगितले की, अशा एआय व्हिडिओंमुळे कोणत्याही प्रकारची गैरसमजूत निर्माण होऊ नये, याकडे लक्ष द्यावे. व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये केवळ कल्पनारम्य आहेत, वास्तविक नाहीत, हे लक्षात ठेवावे. अशा सामग्रीचा आनंद घ्यावा, पण त्यावर विश्वास ठेऊन गैरसमजूत होऊ नये, असे आवाहन केले आहे.
पालीमध्ये बर्फवृष्टी या मथळ्याचा व्हिडिओ व्हाट्सअप स्टेटसला ठेवला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मला फोन केले अरे आपल्याकडे कधी बर्फवृष्टी झाली, खूप छान वाटतेय अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींना तर खरंच वाटले की खरंच बर्फीवृष्टी झाली, कारण शहरातील सर्व ठिकाणे, दुकाने, इमारती, मंदिर, मुख्यालयाचे ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रस्ते व माणसे आदी जशीच्या तशी त्यामध्ये दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ एआयची कमाल आहे हे आवर्जून सर्वांना सांगितले.
पंकज शहा,
विमा प्रतिनिधी, पाली
