प्रशांत नाईक यांनी केली कामाची पाहणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील भूमीगत गटाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी बुधवारी (दि.3) प्रशांत नाईक यांनी केली. आता थांबायचे नाही, असा निर्धार करीत त्यांनी शहरातील विकासकामांना सुरुवात केली आहे. प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता, कामाची गती अशी सर्वच माहिती घेऊन हे काम विनाविलंब करण्यात यावे, अशी सुचना संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
अलिबाग शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. लाखो पर्यटक शहरात फिरण्यासाठी येतात. शहरामध्ये नागरिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक कायमच प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग शहरामध्ये भूमीगत गटार प्रकल्प उभारण्याचा त्यांनी मानस घेतला होता. तो प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. अलिबाग शहरामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत भूमीगत गटार प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळ्यात हे काम करणे शक्य नसल्याने पाऊस संपल्यानंतर प्रशांत नाईक यांनी या प्रकल्पाच्या कामाकडे लक्ष दिले.
अलिबाग शहरातील प्रलंबित असलेल्या भुमिगत गटार प्रकल्पाच्या कामाची पाहणी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी बुधवारी केली. कामाच्या गुणवत्तेची माहिती घेत, कामाला गती मिळावी, विलंब होऊ नये अशी सुचना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आली. भूमिगत गटार प्रकल्प शहरातील स्वच्छता, आरोग्य व तसेच पायाभूत सुविधांसाठी फारच महत्वाचा आहे. त्यादृष्टीने योग्य पध्दतीने काम करण्यात यावे, असे सांगण्यात आले. भूमीगत गटार दोन टप्प्यात असणार आहे.
पहिल्या टप्प्यात 25 किलोमीटरचे गटार
पहिल्या टप्प्यात 25 किलोमीटर तर दूसऱ्या टप्प्यात 17 किलो मीटरचे गटार असणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून प्रकल्पाच्या कामासाठी पहिला 1 कोटी 80 लाख रुपये व व दुसरा हप्ता 2 कोटी 70 लाख रुपये प्राप्त झाला असल्याची माहिती देण्यात आली.
