शिहू बेणसेतील शेतकरी रडकुंडीला

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास पडला गळून
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
परतीच्या व अवकाळी पावसाचा मोठा फटका शिहू, बेणसे, झोतिरपाडा विभागासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्‍याला बसला आहे. ऐन कापणीच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढवले आहे. बहरलेली पिके डोळ्यादेखत चिखलात आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे, अशातच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी मात्र पूर्णतः हतबल व हताश झाला आहे. निसर्गाचा प्रकोप जगू देत नाही, मायबाप सरकारने आम्हा शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा असे साकडे नुकसानग्रस्त शेतकरी घालत आहे.

अतिवृष्टीने व परतीच्या पावसाने उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी येथील शेतकर्‍याच्या हातोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर व व्याकुळ झाला आहे. सततच्या अतिवृष्टीने भाताच्या फुलावर पाऊस पडल्याने फुले झडून गेली.

भाताच्या लोंबीत दाणा तयार झाला नाही. त्यानंतर जो भात निसावला गेला त्या भात पिकावर सतत अतिवृष्टी झाल्याने भात जमिनदोस्त होवून भाताच्या लोंब्यांना अंकूर फुटले. त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या या धक्क्यातून अद्यापही सावरला नाही.

पावसाचा अनियमितपणा, सातत्याने होणारे हवामान बदल व नैसर्गीक आपत्ती, तुकड्यांमध्ये विभागलेली शेती, वाढते औद्योगिकिकरण व वसाहतीकरण आणि उत्पादनापेक्षा उत्पादनखर्च अधिक या सर्व अडचणींमध्ये येथील बळीराजा अडकला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी मदत यामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर होत चाललेला दिसत आहे. शेतकर्‍याला सरकारने आधार देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्याची मुख्य ओळख असलेला कृषीव्यवसाय येत्या काळात धोक्यात येण्याची भीती आहे.

Exit mobile version