| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदारांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळवारा व पावसाने भातपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी पूरता उद्ध्वस्त झाला आहे. त्याहून वेदनादायक म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांसह खासदार, आमदार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले देखील नाहीत. त्यामुळे ज्यांना निवडून दिले त्यांनीच आपल्याकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी बांधवांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मे महिन्यापासून सुरूवात केलेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली तरी पावसाची रिमझिम सुरूच आहे. या अतिवृष्टीने रायगड जिल्ह्यासह शिहू-बेणसे विभागात कापणीला आलेले पीक शेतातील चिखलात रुतले असून, काही प्रमाणात कुजले देखील आहे. तसेच, काही ठिकाणी त्या धानाला कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. सोन्यासाख्या पिकाची माती झालेली पाहून शेतकरी हांबरडा फोडून रडत आहेत. त्याहून वेदनादायी म्हणजे शिहू विभागासह इतरत्र भातपिकाचे नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर आजवर कुणी प्रशासकीय अधिकारी तसेच निवडणुकीवेळी दारोदारी फिरणारे, शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेले आमदार-खासदारदेखील फिरकले नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
एका बाजूला शेतकरी भातपीक उद्ध्वस्त झाल्याने ‘जगावे की मरावे’ या द्विधा मनःस्थितीत आहे. तर, दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पाहावयास मळित आहे. यादरम्यान शिहूच्या ग्रामसेवकाचे या परिस्थितीत कोणतेही सहकार्य लाभत नाही. ते शेतकऱ्यांना या परिस्थितीत भेटत नसल्याचा आरोप करत शेतकरी तथा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी शाखा प्रमुख विश्वनाथ गदमळे यांनी केला असून, या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.







