| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी | अलिबाग-रोहा मार्गावरील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न असताना, वढाव येथील पूल (साकव) सोमवारी (दि.3) सायंकाळी कोसळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, दुचाकीवरील एका महिलेसह दोघाजणांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा रस्त्यांवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटना घडून कित्येक तास उलटूनही शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेफिकीर आणि निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
अलिबाग-रोहा मार्ग वर्दळीचा असून, या रस्त्यावरुन कायमच लहान-मोठी वाहने दिवस-रात्र सुरू असतात. या रस्त्यासाठी 2019 मध्ये निविदा मंजूर करण्यात आली असून, 177 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मोठा गाजावाजा करीत शुभारंभासाठी नारळफोडी केल्याचे जगजाहीर आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम सुरूच झाले नाही. काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करून रस्ता होणार होता. त्यात नवीन पूल बांधण्याचे काम होते. मात्र, या मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा झाली. अलिबाग ते खानावपर्यंत डांबरीकरण तसेच खानाव ते गेल कंपनीपर्यंत काँक्रिटीकरण केले. अद्यापही या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरण अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवाशांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. क्षमता नसताना कंपन्यांची अवजड वाहने या रस्त्यावरून धावत आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी सायंकाळी वढाव ते खानाव रस्त्यावरील साकव मधोमध तुटला. त्यावेळी दुचाकीवरील महिलेला दुखापत झाली असून, त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले.
आधी पूल बांधा!
स्वखर्चाने रस्ता बनवून देण्याचे आश्वासन मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार दळवी यांनी दिले होते. मात्र, रस्ता अपूर्णच राहिला असून, या रस्त्यावरील पूल सोमवारी सायंकाळी कोसळल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आधी पूल बांधा, नंतर रस्ता बनवा, अशी टीका केली.
पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून आठ पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्याने पूल कोसळल्याची प्रतिक्रिया उमरत आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ठप्प
आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी दिले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ठप्प असल्याचे समोर आले आहे. दुर्घटना घडून कित्येक तास उलटले. परंतु, तहसीलदांरसह अन्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहोचली नाही. स्थानिकांनी पुढाकार घेत रस्त्याच्या दोन्ही मार्गावर उभे राहून पूल कोसळल्याची माहिती दिली. सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला दोरी बांधली.
अलिबाग-रोहा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागच्या निष्क्रियतेमुळे आधीच बदनाम झालेला आहे. सदरच्या रस्त्याला असलेल्या पुलाचे ऑडिट झाल्याचा दिंडोरा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिटला होता. मग, हा पूल पडलाय, त्याला जबाबदार कोण? ज्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे ऑडिट केलेय, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये. सर्वसामान्य माणसाचा जीव स्वस्त आहे का?
– ॲड. राकेश नारायण पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
साहेब, याचे श्रेय कोण घेणार?
अलिबाग-रोहा मार्गाच्या दुरुस्तीचे श्रेय घेण्यासाठी यापूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये अनेकदा जुंपल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. मग, आता याचे श्रेय कोण घेणार? ही जबाबदारी आमदारांची की सार्वजनिक बांधकाम विभागाची, असा संतापजनक सवाल येथील जनताच आता विचारत आहे.
प्रशासन निद्रावस्थेत
साकव दुरुस्ती करण्याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. या साकवाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीसुद्धा ग्रामस्थांनी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. बांधकाम विभागच या घटनेला जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
आशिष नामक एका कंपनीला रस्त्याचे काम दिले आहे. रस्त्याच्या कामावर करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या मार्गावरील पुलांच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
बामणगाव-खानावमधील पूल कोसळला. मात्र, कोणतीही शासकीय यंत्रणा वेळेवर पोहोचली नाही. तातडीने पुलाचे काम करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-अमित म्हात्रे,
सामाजिक कार्यकर्ते
वढावनजीक पूल कोसळल्याची माहिती समजली. त्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहे.
मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग










