बगीच्यामधील लग्नसभारंभ उरकले जाताहेत हॉलमध्ये
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होऊनही पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे याचा परिणाम लग्नसमारंभावर होत आहे. रिसॉर्टच्या लॉनवर किंवा उघड्यावर आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आता बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित करण्याची नामुष्की आयोजकांवर येत आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यावसयिकांच्या व्यवसायावर होत आहे. त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती एस.आर. रिसॉर्टचे मालक ओमकार शेवाळे यांनी दिली आहे.
मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अद्यापही थांबायचे नाव घेत नसल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसोबत हंगामी स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांचा देखील त्यात समावेश आहे. दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहानंतर लग्न सराईला सुरुवात होते. अनेकजण आपले लग्न सभारंभ मोकळ्या जागेत, रिसॉर्टच्या लॉनवर अथवा उद्यानात करण्याला पसंती देत असतात. याचा फायदा लग्न समारंभाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यावसायिकांना होत असतो. मात्र, पावसाळा लांबल्याने बंदिस्त हॉलमध्ये लग्न करण्यास भाग पडत असल्याने ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करू पाहणाऱ्यांच्या आनंदावरदेखील विरजण पडत आहे. तर, डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील याचा फटका बसत आहे.
एस.आर.रिसॉर्टचे मालक ओमकार शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक विवाह सोहळे अचानक बंदिस्त हॉलमध्ये हलवावे लागले. त्यामुळे सजावट, ध्वनी व्यवस्था, फोटोशूट आणि अतिथींच्या सोयी-सुविधांमध्ये बदल करावा लागत आहे. आयोजक आणि हॉटेल व्यावसायिकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, काही बुकिंग रद्द झाल्याने हॉटेल उद्योगावरही परिणाम झाला आहे.
बंदिस्त सभागृहांना मागणी
तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. परिणामी, मुलाचे किंवा मुलीचे लग्न घराच्या दारातच करण्याचे स्वप्न अनेक पालक उराशी बाळगून असतात. पाऊस सुरूच राहिल्यास नाईलाजाने लग्नसमारंभ बंदिस्त सभागृहात आयोजित करण्याची वेळ अशा वधू-वरांच्या नातेवाईकांवर येणार आहे. त्यामुळे बंदिस्त सभागृहांना मागणी वाढण्याची शक्यता आहे.
मुलीचा साखरपुडा समारंभ सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत घराच्या दरातच व्हावा याकरिता नियोजन केले होते. पावसामुळे मंडप व्यावसायिकाने नुकसान होण्याच्या भीतीने मंडप उभारण्यास नकार दिल्याने नाईलाजाने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकावा लागला आहे.
हेमंत जगताप,
वधूपिता







