पनवेल महापालिका आयुक्तांचा ‘हातभार’
| पनवेल । वार्ताहर ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला अस्वच्छतेच्या गर्तेतून बाहेर काढण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी पुढाकार घेत पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सहयोगाने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, तरीही भिंतीवर पिचकारी मारल्याने रंगरंगोटीचा मुद्दा समोर आला आहे. गुटखा खाऊन पिचकारी मारणार्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयाला मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
पनवेलच्या जनतेचा आवाज या व्हॉट्सअॅप समूहावर नवीन पनवेल येथील अनेक तरुणांनी चर्चा सुरु ठेवली होती. यामध्ये अनुपम पाटील, आदित्य जानोरकर, अनिकेत, अतिश भोईर, आर्किटेक सुजित, किशोर चंद्रकांत, संदिप भोपी, अशोक शेलार, अभिलाश आणि शैलेश भागवत आदी तरुणाईचा सहभाग होता.
उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छते करिता कर्मचारी उपलब्ध नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची माहिती समोर आली. शिवाय भूमिगत मजल्यावर शवविच्छेदन केंद्रात कुजत असलेले मृतदेहसुद्धा घाणीचे एक कारण बनले होते.
सर्व बाबींचा आढावा घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेकरिता कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना साकडे घालून स्वच्छतेची मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यास सांगितले.
चितळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडून मागणी पत्र हवे असल्याचे कडू यांना सांगितले. त्यानुसार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी महापालिका आयुक्त यांना तातडीने पत्र पाठवून स्वच्छतादूत आणि साहित्याची गरज व्यक्त केली. त्या अनुषंगाने उपायुक्त वैभव विधाते, स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड आदींनी त्यांच्या कर्मचार्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबवून दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य हटवून काढले. आमदार, खासदार, राज्य शासन, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपजिल्हा रुग्णलयात अंतररुग्ण, बाह्य रुग्ण, उपचाराकरिता दाखल केलेल्या रुग्णांना भेटायला येणार्या गुटखा बहाद्दरांनी रुग्णालयाच्या भिंतींवर पिचकार्या मारल्याने खूप घाण झाली आहे. भिंती धुवूनही परिस्थिती बदलत नाही. वारंवार तिकडे रंगरंगोटी करावी लागते. रुग्णलयात सकाळी आणि रात्री एक-एक सुरक्षा रक्षक असल्याने तो गेटवर उभा असतो. त्यामुळे पिचकारी बहाद्दर मोकळे सुटतात. आता सीसीटीव्हीवरील फुटेजच्या सहाय्याने पकडून दंडात्मक कारवाई करावी लागेल.
– डॉ. अशोक गीते,
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक