31 जानेवारी रोजी कार्यान्वित होण्याची शक्यता; वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार?
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिडकोकडून करण्यात येणारा 50.68 कोटी खर्चाचा उरण बायपास रस्ता व त्यावरील पुलाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे काम 31 जानेवारी रोजी पुर्णत्वास जाणार असून, उरण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यात मोठी मदत होणार आहे. अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रियांका रातांबे यांनी दिली. मात्र, उरण नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्याच्या कामातील अडचणींमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार का, असा प्रश्न सध्या उरणकरांमधून उपस्थित होत आहे.
उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सातत्याने केलेला संघर्ष व वाहतूक कोंडीच्या समस्यांच्या पाठपुराव्यानंतरच सिडकोकडून उरण बायपास रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिडकोने द्रोणागिरी नोडमधील आनंदी हॉटेल ते उरण शहरातील कोर्ट पर्यंतचा 1,341 मीटर लांबीचा आणि 11 मीटर रुंदीचा बायपास रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या 1,341 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 400 मीटर लांबीचा रस्ता उरण नगरपरिषदेच्या अखत्यारीत येत आहे. उर्वरित 941 मीटर लांबीचा बायपास रस्ता सिडको मार्फत बांधण्यात येत आहे. त्यामध्ये 6.40.425 मीटर लांबीचा पुल व 153.004 लांबीच्या सिमेंट कॉक्रिटच्या रस्त्यासह 148.071 लांबीच्या रिटेनिंग वॉलचा समावेश आहे. मागील सात-आठ वर्षांपासून सुरू असलेल्या 50.26 खर्चाचे काम आता 85 टक्के पुर्ण झाले आहे. त्यामुळे सिडकोच्या अखत्यारीत असलेले उरण बायपास रस्त्याचे काम 31 जानेवारी अखेरीस पुर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा बायपास रस्ता व पुल कार्यान्वित झाल्यानंतर उरण शहरातील जनतेचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रियांका रातांबे यांनी व्यक्त केला आहे.
याआधीच विलंबामुळे 8 कोटी खर्चाचे काम आता 59.26 कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. तसेच, सिडकोच्या अखत्यारीतील 941 मीटर लांबीचा बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही उरण नगरपरिषदेच्या अखत्यारीतील फक्त 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम रखडलेले आहे. हा रस्ता जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत या बायपास रस्त्यावरुन वाहतूक शक्य होणार नाही. कारण नगरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यामुळे खासगी घरे व जमिनीही बाधीत होणार आहेत. ही समस्या सुटेपर्यंत उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत जाणार असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
आमदारांची उदासिनता
उरण बायपास मार्गावरील नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यावरील 15 मुळ भोगवटादार आणि इतरांच्या मालकीच्या 4200 चौरस मीटर जमिनी संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नगरपरिषदेकडे भोगवटादारांना मोबदला देण्यासाठी 12 कोटींचा आवश्यक निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या निधीसाठी नगरपरिषदेने शासनाला गाऱ्हाणे घातले आहे. दरम्यान, उरणच्या विकास कामांसाठी 6 हजार कोटींचा निधी आणण्याचा दावा करणारे आमदार महेश बालदी यांनाही 12 कोटींच्या निधीची तरतूद करणे अद्यापही शक्य झाले नसल्यामुळे त्यांची देखील उघड उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे, उरण बायपास रस्त्याच्या कामाचे घोंगडे भिजत पडले आहे.
संपादीत करण्यात येणाऱ्या 15 भोगवटादारांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी 12 कोटी निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी उरण बायपास रस्त्याचे काम तातडीने होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-निखिल ढोरे,
सहाय्यक रचनाकार,
उरण नगररचना विभाग







