तंत्रज्ञानाच्या वापराने पर्यटन झाले सुकर

विविध अ‍ॅप आणि सर्च इंजिनचा वापर
। गौसखान पठाण । सुधागड-पाली ।
आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि कौटुंबिक पर्यटनासाठी मनमुराद आनंद देणारे सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून रायगड जिल्हा हा सर्वोत्तम पर्याय या कोव्हिड काळात मानला गेला. रायगड जिल्हा पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन बनला आहे. त्यामुळेच फक्त पुण्या-मुंबईतीलच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून अनेक पर्यटक रायगडकडे ओढले जात आहेत. कालौघात तसेच कोरोना काळात येथील पर्यटनाचे व पर्यटन स्थळांजवळ राहण्यासाठीचे बुकिंग करण्याच्या व स्थळ शोधण्याच्या पारंपरिक पद्धती जाऊन त्याजागी ऑनलाइन बुकिंग व विविध मोबाईल अ‍ॅप वापरले जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने पर्यटकांची तर सोय झाली आहेच’ पण याबरोबरच येथील हॉटेल व्यावसायिकदेखील अपडेट होताना दिसत आहेत. कोरोना महामारीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व फायदा येथील बहुतांश व्यावसायिकांनी घेतलेला पहायला मिळाला. अनेकांनी आपली स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. तसेच मेक मायट्रिप, ट्रिव्हागो, गो-आयबोबो, रेड बस, ओयो अशा विविध अ‍ॅपवरदेखील नोंदणी केली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व पर्यटन क्षेत्राची माहिती, सेवासुविधा आणि फोटो दूरदूरवरील पर्यटकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात कोठेही राहायचे असेल आणि पर्यटन करायचे असेल तर ग्राहकांना किंवा पर्यटकांना आगाऊ बुकिंग करता येते आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आधुनिक व नवीन स्थित्यंतरे आली आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला नवी उभारी मिळून तो अधिक ग्लोबल व तंत्रज्ञानयुक्त होत आहे. परिणामी महत्त्वाच्या व इतर पर्यटन स्थळांवर आमूलाग्र बदल होत आहे. अनेक दुर्लक्षित पर्यटन स्थळांवरदेखील पर्यटक गर्दी करू लागले आहेत.


पर्यटनाचा मनमुराद आनंद
डोळ्यांचं पारणं फेडणारे निसर्ग सोंदर्य, तब्बल 240 कि.मी. लांबीचा विस्तीर्ण व मनमोहक समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, अष्टविनायकाचे क्षेत्र महड व पालीचा गणपती यांसह विविध गडकिल्ले, लेणी, ऐतिहासिक वास्तू, देवालये आणि निसर्ग सौदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्याला नेहमीच पर्यटकांची पसंती असते. पारंपरिक पर्यटन व्यतिरिक्त रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, हायकिंग, पॅरासेलिंग, बंजी जंपींग आदींचा अनुभव घेण्यासाठी खास पर्यटन केले जात आहे.


डिजिटल पेमेंट व नेटबँकिंगचा वापर
बहुतांश पर्यटक डिजिटल म्हणजेच विविध पेमेंट अ‍ॅपचा तसेच नेटबँकिंगचा वापर खरेदी व बिले पेमेंटसाठी करत आहेत. येथील मोठ्या व्यावसायिकांबरोबरच छोट्या-मोठ्या दुकानदारांनीदेखील ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटल पेमेंटचे विविध पर्याय ठेवले आहेत. एकंदरच, यामुळे आर्थिक व्यवहार डिजिटल झालेच; पण ते सुरक्षित व सोयीचेदेखील होत आहेत.

Exit mobile version