श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम
| पेण | प्रतिनिधी |
तालुक्यातील वढाव गावचे ग्रामदैवत बहीरीदेवाची यात्रा मंगळवारी संपन्न झाली. निवडूंग प्रजातीतील काटेरी झाड असलेले पेरकुट अंगावर मारण्याची अनोखी प्रथा येथे आहे. या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येत भाविक या यात्रेसाठी वढाव गावात येतात. काटेरी पेटकुट अंगावर मारून देखील भक्तांना काही होत नाही. रक्तबंबाळ अवस्थेत भाविक बेधुंद नाचतात, ही प्रथा पाहण्यासाठी हजारो नागरिक देखील येथे येतात.

चैत्र महिन्याची चाहूल लागली की, पेण तालुका परिसरात ग्रामदैवतांच्या यात्रांना सुरुवात होते. या यात्रा म्हणजे ग्रामीण जीवनातील परंपरा, श्रद्धा आणि सामूहिक संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारा उत्सव असतो. अशाच वैशिष्ट्यपूर्ण यात्रांपैकी एक म्हणजे वढाव बहिरी देवाची यात्रा होय. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, बहिरी देवाचा ‘छबिना’ डोक्यावर घेऊन नाचवण्याची परंपरा. ढोल-ताशांच्या गजरात हा छबिना संपूर्ण पंचक्रोशीत फिरवला जातो. या सोहळ्यात गावकऱ्यांचा आणि भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो.
यात्रेतील आणखी एक आकर्षण म्हणजे ‘लेपा’ फिरवण्याची प्रथा. यामध्ये तरुणांकडून पारंपरिक पद्धतीने अंगावर काटेरी पेरकुट (निवडुंग) मारण्याची प्रथा आजही जपली जाते. श्रद्धेच्या भरात अनेक तरुण स्वतःच्या अंगावर पेरकुट मारताना दिसतात. काही जण या कृतीत इतके तल्लीन होतात की ते रक्तबंबाळ होतानाही मागे हटत नाहीत. तसेच काही भाविक पेरकुटांच्या राशींवर उड्या मारतानाही दिसून येतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून, भाविक ती अत्यंत श्रद्धेने पाळत आहेत. सायंकाळच्या सत्रात देवकाठ्यांची चढाओढही यात्रेचे आणखी एक आकर्षण ठरते. या आगळ्यावेगळ्या परंपरा आणि थरारक विधी पाहण्यासाठी रायगड जिल्हा तसेच आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक वढाव येथे हजेरी लावतात. श्रद्धा, परंपरा आणि उत्साह यांचा संगम अनुभवण्यासाठी ही यात्रा विशेष ओळख निर्माण करत आहे.







