भामट्याने दोघांना घातला गंडा

3 लाख 62 हजार रूपये घेऊन झाला फरार
। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी एक भामटा काही दिवस वास्तव्यासाठी आला होता. त्याने अनेकांना आपल्या गोडवाणीने आपल्या जाळ्यात अडकविले आणि लाखो रुपये तसेच किराणा माल घेवून कोणासही थांगपत्ता न लागता फरार झाला आहे. याबाबत अज्ञात इसमाबाबत संबंधितांनी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुतारवाडी नाक्यावर एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी भाड्याने खोली घेऊन वास्तव्य करत होती. या दरम्यान त्याने अनेकांची मने जिंकली आणि भूलथापाना अनेकांना आपल्या जाळ्यात अडकविले. मी पुणे जिल्ह्याचा सर्वेक्षण अधिकारी आहे. रायगड जिल्ह्यात दोन लेखनिकाच्या जागा रिक्त आहेत, त्या भरावयाच्या आहेत त्यासाठी 2 लाख रूपये दिले तर काम नक्की होईल असे सांगून एका व्यक्तीकडून 2 लाख रुपये उकळले. एवढेच नाही तर एका दुकानदाराकडून 1 लाख 62 हजार रुपयांचा किराणा सामान आणि रोख रक्कम घेवून सुतारवाडी येथून पलायन केले. या बाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version