जिल्ह्यातील शेतकरी लागले कामाला

भाजीपाला लागवड हंगाम सुरू

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला लागवडीच्या कामाला लागले आहेत. घराच्या बाजूला अथवा शेतांवरील मोकळ्या जागेत परसबागेच्या माध्यमातून भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शेतकर्‍यांकडून मिरची, टोमॅटो, वांगी अशा अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड हजारो एकर क्षेत्रामध्ये घरच्या घरी करण्यावर भर दिला जात आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कोणालाही विनाकारण घरातून बाहेर पडता येत नव्हते. दैनंदिन लागणारा भाजीपालादेखील बाजारातून आणता येत नव्हता. त्यामुळे गावांतील काही महिलांनी पुढाकार घेत घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली होती. गेल्या अनेक वर्षापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल शासनाने घेतली असून परसबाग तयार करण्यासाठी पुढाकारदेखील घेण्यात आला आहे. आता पावसाचा हंगाम संपला असून थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतासह परिसरातील मोकळ्या जागेत परसबागेच्या माध्यमातून वांगी, भेंडी, मिरचीसारख्या अनेक भाजीपालांची लागवड करण्याच्या कामाला शेतकरी लागले आहेत. त्यामध्ये महिलांचा पुढाकार अधिक असल्याचे दिसून येत आहे.

कोबी, मुळा, मिरची, टोमॅटो, अल्कोल, दुधी, गवार, कारली, वांगी अशा प्रकारच्या भाजीपाला लागवडीला सुरुवात झाली आहे. सकाळी पाणी घालणे, गवत काढणे अशी अनेक कामे महिला शेतकरी करीत आहेत. घरकाम करीत असतानाच मोकळा वेळ भाजीपाला लागवडीवर दिला जात आहे. आज याच माध्यमातून विषमुक्त भाजी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लाल कोबी लागवडीचा प्रयोग
अलिबाग तालुक्यातील उसर येथील नम्रता शिंदे या प्रगतशील महिला शेतकरी आहेत. शेतासह परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न कायमच राहिला आहे. लाल कोबीची लागवड साधारणतः पुणे, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. नम्रता शिंदे या शेतकरी महिलेने लाल कोबी शेतामध्ये लावण्याचा नवीन प्रयोग केला आहे. त्याची लागवड त्यांनी शेतामध्ये केली आहे. त्यांचे पती निलेश शिंदे यांची साथ त्यांना मिळाली असून शेतामध्ये नवनवीन प्रकारच्या भाज्यांची लागवड ते करीत आहेत.

गृहिणी म्हणून काम करीत घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्याचा प्रयत्न कायमच राहिला आहे. घरातील मंडळींचीदेखील चांगली साथ मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करून दैनंदिन स्वयंपाकासाठी भाजीचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरातील मंडळींना विषमुक्त भाजी परसबागेतून मिळण्याचा आनंद आहे.

– नम्रता शिंदे, महिला शेतकरी

Exit mobile version