रोजगाराअभावी कुटुंबांचे मोठ्या शहरांकडे स्थलांतर
| तळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याची दिवसेंदिवस होत असलेली दयनीय अवस्था चिंतेचा विषय बनली आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव, वाढते स्थलांतर आणि घटती लोकसंख्या यामुळे तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक तरुणांना प्रत्येक निवडणुकीत रोजगाराच्या आश्वासनांची खैरात केली जाते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर ही आश्वासने हवेत विरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रोजगार निर्मितीसाठी शासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाहीत तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रभावी पुढाकार घेतला नाही, अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.
रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी मुंबईसह मोठ्या शहरांकडे स्थलांतर केले आहे. या स्थलांतराचा सर्वाधिक परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला असून, तालुक्यातील शाळांच्या पटसंख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या काही वर्षांत १३ पेक्षा अधिक शाळांना कुलूप लागले आहे. फळशेत, कासेवाडी, मालूक कोंड, महागाव, महुरे, सोलमवाडी, बहुलेवाडी, कोणथरे, जांभाडी वस्ती, पुसाटी तळे, उसर खुर्द, वावे मांद्रज आणि तांबडी येथील शाळा बंद झाल्या आहेत. एकेकाळी गावात शाळा सुरू व्हाव्यात म्हणून ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांनंतर उभ्या राहिलेल्या या शाळांच्या इमारती आज ओस पडत आहेत. काही ठिकाणी दोन खोल्यांच्या शाळेत दोनच विद्यार्थी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या तालुक्यात ८४ शाळा कार्यरत असून त्यापैकी २५ शाळांची पटसंख्या पाच किंवा त्याहून कमी आहे. प्रशासनाकडून मराठी माध्यमाच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येला इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणाला कारणीभूत ठरवले जात असले, तरी स्थानिकांच्या मते हे वास्तव नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक घरे बंद असून उरलेल्या घरांत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. लोकसंख्या घटल्याने बाजारपेठा ओस पडत असून स्थानिक व्यवहार आणि आर्थिक घडामोडींवरही परिणाम झाला आहे. रोजगार, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पुनर्वसन होणे गरजेचे
तळा तालुक्याचा उतरता आलेख रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि ग्रामीण पुनर्वसनाच्या दृष्टीने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा वाढते स्थलांतर आणि घटती लोकसंख्या यामुळे भविष्यात तळा तालुक्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
