इंडिया आघाडीचा विजय निश्‍चित- आ. जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

देशात सध्या राजकारण बदलत चालले आहे. सद्यस्थितीची वेळ आणिबाणीची आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून अनेक पक्ष, संघटना एकत्र आल्या आहेत. भाजपविरोधी सरकार सत्तेत येण्याची परिस्थिती देशभर आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत जोमाने काम करावे लागणार आहे. त्यामुळे आपला विजय हा निश्‍चितच राहणार आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले.

चौल ग्रामपंचायतीच्या आयएसओ मानांकन प्रदान सोहळयाप्रसंगी आ. जयंत पाटील गुरुवारी बोलत होते. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील,
पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप घरत, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, युवा सेना अधिकारी पिंट्या ठाकूर, चौलच्या सरपंच प्रतिभा पवार, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक जितेश्री पोटफोडे, तालुका प्रमुख शंकर गुरव, अतिरिक्त गटविकास अधिकारी मंगेश पाटील, कोलई सरपंच राजश्री मिसाळ, बंड्या पाटील आदी उपस्थित होेते.

यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले की, चौल हे अष्टागरातील एक गाव आहे. आयएसओ मानांकन मिळविणे सोपे नाही. हे फार कठीण काम आहे. त्यापध्दतीने संस्थेचे काम असणे आवश्यक असून हे मानांकन मिळविण्यासाठी अटी, नियमांचे पालन योग्यपध्दतीने करावे लागतात. त्यामध्ये चौल ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळवून एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

देशामध्ये इंडिया आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जातीवादी भाजप सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणूकीत इंडिया आघाडी केंद्रात येणार असून त्यामधे अनंत गीते मंत्री असणार आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या- अनंत गीते
नेत्यांचे मनोमिलन झाले आहे. आता कार्यकर्त्यांनी आपआपले मतभेद विसरून लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र या. कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचे आहे. त्या मनोमिलनातून अलिबागमध्ये नवा इतिहास निर्माण करायचा आहे.

Exit mobile version