| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाचे चित्र शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले. महाविकास आघाडी विरुध्द महायुतीमध्ये झालेल्या या लढतीमध्ये आश्वासनांचा पाऊस पाडणारे उमेदवार निवडून आले. मतदारांना आमिष दाखवून, अनेक आश्वासनं देत तर काही ठिकाणी दबावतंत्र वापरुन सत्ताधार्यांनी राजकारण केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. धनशक्तीपुढे जनशक्ती हारली, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदार संघातील 24 लाख 88 हजार 788 पैकी 17 लाख 21 हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये आठ लाख 38 हजार 459 महिला व पुरुष आठ लाख 82 हजार 555 आणि इतर 24 मतदारांनी मतदान केले. मतदानानंतर अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतांची मोजणी फेरीनुसार करण्यात आली. जिल्ह्यातील श्रीवर्धन, पनवेल, अलिबाग, कर्जत, उरण, पेण व महाडमध्ये महायूतीच्या उमेदवारांचा विजय झाला.
मतदारसंघातील जनतेने दिलेले भरभरुन मतदानरुपी प्रेम आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे आज ही लढाई आपण लढलो. हार-जीत होत असते. त्यामुळे कोणीही कार्यकर्त्यांनी खचून न जाता, संयम बाळगावा. हा लढा पुढे असाच चालू राहील.
प्रीतम म्हात्रे,
उमेदवार, उरण