। श्रीवर्धन वार्ताहर ।
श्रीवर्धन येथे महाविकास आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी फटाके वाजवून आम्ही आनंद व्यक्त करत अहोत. आता फक्त अनंत गीते यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. पंडित पाटील यांनी केले आहे.
श्रीवर्धन तालुका शेकाप सरचिटणीस वसंत यादव यांच्या निवासस्थानी माजी आ. पंडित पाटील व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले असता फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया देताना पंडित पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकी पुर्वी काही जणांनी श्रीवर्धन मतदारसंघात युती, आघाडी झाल्याचा आभास निर्माण केला होता. हा मतदारसंघ म्हणजे यांचीच जहागिरी आहे व या मतदारसंघात आमचे विरोधक नगण्य आहेत, असा त्यांचा गैरसमज होता. 7 मे रोजी मतदान झाले व मतदारांनी जो प्रतिसाद दिला आहे तो बघता निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, आप, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या संघटना व सामाजिक संस्था यांनी कमी वेळात चांगले काम केले आहे. हि निवडणुक म्हणजे धनशक्ती विरुद्ध गरीबांची लढाई असे चित्र श्रीवर्धन मतदारसंघात होते. मतदारांनी पाकीटांकडे न बघता प्रामाणिक व स्वच्छ उमेदवाराला मतदान केले आहे याचे चित्र या मतदारसंघाचा आढावा घेताना त्यातून स्पष्ट झालं आहे.
यावेळी श्रीवर्धन तालुक्यात ठाकरे गटाच्याच शिवसेनेचे वर्चस्व आहे हे सांगताना माजी आ. पंडीत पाटील यांनी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख संजय कदम, तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर, शहर प्रमुख राजेश चव्हाण यांचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),काँग्रेस नेते परवीन शेख, सादीक राऊत, शेकापचे संतोष पाटील, वसंत यादव हे निवडणुकी दरम्यान कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी न पडता महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयासाठी काम करत राहीले, असे यावेळी आ. पंडित पाटील यांनी नमूद केले.
आनंद हा प्रामाणिक मतदारांसाठी पराजय हा निश्चित आहे याची जाणीव झाल्यावर खेडेगावांमधून पाकीटे वाटपाचा कार्यक्रम, तसेच गावकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मतदारांनी प्रामाणिकपणे मशाल चिन्हासमोरच बटण दाबत आपला मतदानाचा हक्क बजावला. कुठल्याही अमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीला मतदान केले, त्याचाही आनंद आम्ही आज व्यक्त केला आहे..