। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी (ता.16) पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबरोबर सापडलेला मुद्देमाल देखील नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे सुधागड तालुक्यातील गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर व पोलीस शिपाई रामसेवक कांदे यांनी छापा घालून एक बेवारस गावठी दारूची हातभट्टटी उद्ध्वस्त केली. त्यात 1 पत्र्याची 200 लिटरची टाकी व प्लास्टिकचे 25 लिटर प्रमाणे 4 ड्रम यामध्ये एकूण 300 लिटर गुळ व नवसागर मिश्रित रसायन व दारूनिर्मिती साहित्य जप्त केले. या मालाची एकूण किंमत अंदाजे 8600 रुपये आहे. हे सर्व साहित्य व माल हा जंगल भागांमधून वाहून घेऊन जाण्यास अवजड व अवघड असल्याने पोलिसांनी सदर मालाचा जागेवरच पंचनामा करून टाकी व प्लास्टिक ड्रम फोडून टाकले. दारू व दारूनिर्मितीचे रसायन जमिनीवर ओतून जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. या कारवाई बद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.