थापा ठोकणार्‍यांना शॉक देणार- संजय पाथरे

। महाड । प्रतिनिधी ।

महाड मतदार संघातील नाते गावात मविआ पुरस्कृत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांची गावबैठक अतिशय उत्साह वातावरणात संपन्न झाली. यावेळी जेष्ठ, तरुण आणि महिला कार्यकर्त्यांचा उत्साह 23 तारखेच्या विजयाची ग्वाही देत होती. यावेळी रायगड जिल्हा सह संपर्क प्रमुख बाळकृष्ण राऊळ, उमेदवार स्नेहल जगताप, कृष्णा शिंदे, माजी सभापती दीप्ती फळसकर यांची भाषणे झाली.

यावेळी बोलताना संजय पाथरे यांनी महाड मतदार संघात थापा मारणार्‍या आमदारांना या निवडणुकीत जनता शॉक देणार असल्याचा इशारा व्यक्त केला आहे. नाते गावात जमलेल्या मतदारांमुळे स्नेहल जगताप यांचा विजय हमखास असल्याची प्रतिक्रिया बाळकृष्ण राऊळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्या आमदार गोगावले यांनी निष्ठा आम्हाला शिकवू नये. आ. गोगावले यांच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे हात व शिवसैनिकांचा पाठींबा असताना ही त्यांनी गद्दारी करत शिवसैनिकांचा अपमान केला आहे. निष्ठा आम्ही राखली आहे, ती कायम राखणार. महिलांना 1500 रुपये नकोत, तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार हवा आहे. यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याची ग्वाही स्नेहल जगताप यांनी दिली आहे.

Exit mobile version