15 व्या वर्षी ऐक्याचे भव्य दर्शन
| रेवदंडा | निलेश फुंडे |
सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसतात, तर ते समाजातील एकजूट, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपणारे संस्कारमंच असतात. रेवदंडा नगरीत यंदा साजरा झालेला साखरचौथीचा “रेवदंड्याचा राजा” उत्सव याच सामाजिक ऐक्याचे आणि लोकसहभागाचे जिवंत उदाहरण ठरला. उत्सवाच्या यशामागे कोणत्याही एका व्यक्तीचा वाटा नसून, मंडळातील प्रत्येक सदस्य, कार्यकर्ता, वर्गणीदार आणि रेवदंड्यातील नागरिकांच्या सामूहिक सहभागाची ही यशोगाथा असल्याची भावना मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यंदा “रेवदंड्याचा राजा” आपल्या 15 व्या वर्षात पदार्पण करत असताना उत्सवाला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक क्षण भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक ऐक्याने भारलेला होता. मंडप उभारणीपासून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा आणि विसर्जन मिरवणुकीपर्यंत प्रत्येक कामात कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. विशेष म्हणजे, संपूर्ण उत्सव नागरिकांनी स्वखुशीने दिलेल्या लोकवर्गणीतून पार पडला. कोणत्याही प्रकारची कमतरता न भासता सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडणे, ही रेवदंडेकरांच्या विश्वासाची आणि मंडळावरील प्रेमाची पावती ठरली. गावातील ज्येष्ठ, तरुण, महिला आणि बालगोपाळ अशा सर्वच स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मंडळातील निलेश खोत यांनी सांगितले की, “आम्ही सर्वजण केवळ निमित्तमात्र आहोत. हा उत्सव घडवून आणणारा खरा सूत्रधार म्हणजे आपला गणराया. बाप्पाच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वी झाला. मंडळातील प्रत्येक सदस्याने स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळेच हा उत्सव सर्वांच्या मनात घर करून गेला.”
यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन. विविध धर्म, जाती आणि समाजघटकांतील नागरिकांनी कोणताही भेदभाव न ठेवता “रेवदंड्याचा राजा हा आपला बाप्पा” मानत उत्सवात सहभाग घेतला. गावातील अनेक ठिकाणी बाप्पाचे स्वागत फुलांची उधळण, हार अर्पण आणि जयघोषाने करण्यात आले. या प्रसंगी रेवदंडा नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत बेंजो पथक, ढोल पथक, पारंपरिक वाद्यांचा गजर, जल्लोषमय वातावरण आणि भक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात तरुणाईसह आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आनंद, उत्साह आणि परंपरेचे भान राखत विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
गेल्या 15 वर्षांत “रेवदंड्याचा राजा” हा केवळ गणेशोत्सव न राहता रेवदंडा गावाच्या एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. समाजातील मतभेद, राजकीय भिन्नता आणि वैचारिक अंतर बाजूला ठेवून सर्वांना एकत्र आणण्याचे काम या उत्सवाने सातत्याने केले आहे. त्यामुळेच हा उत्सव रेवदंडेकरांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनला आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, वर्गणीदारांचे, मंडळांचे, ज्येष्ठांचे, महिला भगिनींचे, युवकांचे आणि उत्सवात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे निलेश खोत यांनी मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.







