नळपाणी योजनेचे पाणीगळती ग्रामस्थांच्या मुळावर
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील बार्डी गावातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. गावाला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर असलेली गळती यामुळे पाणी बार्डी गावात पोहोचत नाही. दरम्यान, नवीन नळपाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
चिंचवली ग्रामपंचायतीमधील चिंचवली, भाणसोली आणि बार्डी गावासाठी 20 वर्षांपूर्वी नळपाणी तयार करण्यात आली होती. उल्हास नदीवर आंबिवली येथून आणले जाणारे पाणी चिंचवली येथे रेल्वे फाटकाच्या बाजूला असलेल्या जलकुंभात पाणी आणले जायचे. मात्र, ते जलकुंभदेखील गळतीमुळे बंद करण्यात आले असून, ग्रामस्थांना आता थेट नदीवरून जलवाहिनीतून सार्वजनिक स्टँड पोस्टवर पोहोचवले जाते आणि स्थानिक ग्रामस्थ तेथे पिण्याचे पाणी भरतात.
बार्डी गावात सहा ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्टँड पोस्टवर पूर्वी दररोज आळीपाळीने अर्धा तास पाणी सोडले जायचे. मात्र, गेली काही महिने बार्डी गावातील ग्रामस्थांना अगदी अल्प प्रमाणात पाणी पोहोचत असून, त्यामुळे येथील महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चिंचवलीपासून बार्डी गावाकडे येणारी जलवाहिनी तसेच चिंचवली भागातील जलवाहिनी यावर असलेली गळती यामुळे सर्व भागात पिण्याचे पाणी पोहचत नाही. पाण्याच्या नेहमीच्या समस्येमुळे बार्डी गावातील महिलांना गावाच्या बाहेरून जाणार्या उल्हास नदीवर हांडे घेऊन पाणी आणायला जावे लागत आहे.
सध्याचा उन्हाळा लक्षात घेता महिलांची सुरू असलेली पाण्यासाठी धावपळ पाहून ग्रामपंचायत सदस्या दीपाली कांबरी यांनी ग्रामपंचायतला धार्यावर धरले आहे. दीपाली भरत कांबरी यांच्यासह रेश्मा पांडुरंग कांबरी, चेतना वसंत कांबरी, राजश्री योगेश कांबरी, योगिता अल्पेश पाटील,नेत्रा निलेश पाटील,पुष्पा गणेश कांबरी, भारती हरेश्वर कांबरी यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली धावपळ थांबवावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीची नळपाणी योजना जुनी असून, जलवाहिनीमधून काही ठिकाणी आणि व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती सुरू आहे. मात्र, दुरुस्ती करायला ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याने जलवाहिनीची दुरूस्ती करता येत नाही. नवीन नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव प्रलंबित असून, शासनाने चिंचवली, बार्डी गावाची नळपाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. – हरिश्चंद्र निर्गुडा, ग्रामविकास अधिकारी, चिंचवली ग्रामपंचायत