तळीये ग्रामस्थांना मिळणार तात्पुरता निवारा

24 ऐवजी 63 पर्यायी कंटेनर घरांची मागणी
। महाड । जुनेद तांबोळी ।
महाडमधील तळीये गावात कोसळलेल्या दरडीने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून याठिकाणी तात्काळ मदतीचा ओघ सुरु झाला. या दुर्घटनेत गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना शासनाने स्थलांतर करत पर्यायी जागेत तात्पुरते कंटेनर निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मंजूर केलेल्या 24 पैकी 8 कंटेनर तळीये गावात दाखल झाले आहेत.महाड तालुक्यातील दुर्गम अशा तळीये गावात 22 जुलै रोजी आलेल्या दरडीमध्ये जवळपास 84 लोकांना प्राण गमवावा लागला. यातून वाचलेल्यांना आणि मृतांच्या नातेवाईकांना तळीये गावात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येत असून तात्पुरत्या स्वरूपात निवारा मिळण्यासाठी कंटेनर निवासाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शासनाकडून 24 कंटेनर मंजूर झाले असून त्यातील आठ कंटेनर उपलब्ध झाले आहेत. उर्वरित पर्यायी निवास लवकरच उपलब्ध होणार आहेत. तळीये मध्ये 22 कुटुंब मातीत उध्वस्थ झाली असली तरी प्रत्येक घरात एक ते दोन स्वतंत्र कुटुंब वास्तव्यास असल्याने 24 तात्पुरती घरे पुरणार नसून 24 ऐवजी 63 तात्पुरते निवास शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तळीये गावातील 60 कुटुंबाचे पुनर्वसन म्हाडातर्फे केले जाणार आहे. याकरिता 12 एकर जागा निचित केली आहे. मात्र ही जागा संपादित करावी लागणार असल्याने सदर जागेचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालय पाठवणार आहे. सद्या हे सर्व जन प्राथमिक शाळा, नातेवाईक, आणि अन्य ग्रामस्थांकडे राहत आहेत.

Exit mobile version