तामसोली ग्रामस्थांनी दिले भेकरीला जीवदान

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील तामसोली गावामध्ये शुक्रवारी (दि.18) सकाळी 10 वाजता जंगलातील भेकर जातीची एक प्राणी गावालगतच्या ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आली होती. या भेकरीला बघून काही कुत्रे या भेकरीच्या मागे लागली. त्यामुळे सदर भेकर तमसोली गावातील नागरिक लक्ष्मण उमाजी चव्हाण यांच्या घरामध्ये शिरली.

त्यानंतर ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश डोबले यांनी तामसोली गावचे पोलीस पाटील महेश शिरसे यांना याबाबतीत फोन करून माहिती दिली. पोलीस पाटील महेश शिरसे यांनीही कोणताही वेळ न घालवता तत्काळ वन खात्याचे नागोठणे परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांना फोन केला. त्यानंतर दादासाहेब कुकडे यांनी वन खात्याचे नागोठणे कार्यालयातील आपले कर्मचारी कानसई हद्दीतील वनपाल जितेंद्र नाईक व वनरक्षक मनीष गोतरणे यांना तामसोली येथे पाठवले व पंचनामा केल्यानंतर त्या वन्यजीव प्राण्यास जंगलामध्ये सोडण्यात आले. अशाप्रकारे एका वन्य जीवाला आपल्या प्राणास मुकावे लागल्यापासून वाचविणारे तामसोली येथील नागरिक, तामसोलीचे पोलीस पाटील महेश शिरसे तसेच नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे व वन खात्याच्या नागोठणे कार्यालयातील संबंधित सर्व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version