। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
निजामपूर रायगड किल्ला मार्गावर जगातील सर्वात छोट्या जंगली मांजर प्रजातीतील ‘वाघाटी’ जंगली मांजर मृतावस्थेत आढळले. वाहनाच्या धडकेमुळे हे मांजर मृत झाले.
रायगड किल्ला दर्शन व येथील निसर्ग पर्यटनास आलेले मुंबई येथील छायाचित्रकार सत्यजित माने आणि सोबत माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर माणगाव निजामपूरमार्गे रायगड किल्ल्याकडे जात होते. या मार्गावर रायगड किल्ल्याच्या जवळपास पाच सहा किलोमीटर अंतर अलिकडेच रस्त्याच्या मधोमध कुणातरी अज्ञात वाहनाने ठोकर मारुन मृतावस्थेत पडलेले एक मांजर दिसून आले. वाहन थांबवून शंतनु व सत्यजित माने खाली उतरले. सहसा दृष्टीस न पडणारे हे दुर्मिळ जंगली मांजर म्हणजे ‘वाघाटी’ हे जगातील सर्वात छोट्या आकाराची जंगली मांजर प्रजाती असल्याची खात्री वन्यजीव अभ्यासक शंतनु याने केली असता हा नर वाघाटी असल्याचे सांगितले.
वाघाटीचा रंग व अंगावरील ठिपके हे थोडे-फार बिबट्याप्रमाणेच असतात. बिबट्याच्या लहान प्रतिकृतीसम हे मांजर दिसते. या जंगली मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्याजवळ देखील याचा वावर असतो. रायगडच्या जंगल वाटेवरुन ते क्वचितच नजरेस पडते.
जगातील सर्वात लहान जंगली मांजर प्रजात, रस्टी स्पॉटटेड कॅट म्हणजेच हि वाघाटी अतिशय लाजाळू असून मुख्यतः निशाचर असते. रात्रीच्या वेळेत छोटे सस्तन प्राणी, सरपटणारे जीव व कीटक खाते. पावसाळी दिवसांमध्ये त्यांना झाडी झुडुपे आणि गवतामध्ये अन्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या दिवसांमध्ये फार क्वचित नजरेस पडते. जवळपास भारतात सर्वत्र या मांजराचा अधिवास दिसून येतो. लपून राहण्याच्या आपल्या कलेमुळे व छोट्या आकारामुळे वाघाटीचे दर्शन होणे तसे फारच दुर्मिळ असते.
या घटनेतून रायगड किल्ल्याचा परिसर जैवविविधतेने संपन्न असून येथील परिसर वन्यजीवांच्या दृष्टीकोनातून देखील किती संवेदनशील आहे, हे अधोरेखित झाले आहे, असे शंतनु कुवेसकर यांनी सांगितले. रायगड किल्ला परिसर आणि माणगांव तालुक्यात देखील अनेक परिसरांमधून वाघाटीचे दुर्मिळ दर्शन घडते. यापूर्वी रायगड किल्ल्याजवळ वाघाटीपेक्षा देखील अधिक दुर्मिळ ‘लेपर्ड कॅट’चे देखील दर्शन झाल्याचे शंतनु यांनी सांगितले आहे. जंगल परिसरांमधील रस्त्यांवरून जात असताना वाहने सावकाश चालवत कोणत्याही वन्यप्राण्याला धडकून अपघात होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले आहे.