सर्वसामान्य, शेतकरी, कामगारांचा आवाज पोरका झाला….

डॉ. भाई. बाबासाहेब देशमुख
(प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र)


बातमी ऐकून काळजामध्ये धस्स झाले. विश्‍वासच बसेना. फोन करून खात्री करावी तर हात थरथर कापत होते. सर्वत्र वार्‍यासारखी बातमी पसरली. मन सैरावैरा झाले. मागील काही महिन्यांमध्ये आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर दुःखातून सावरतो न सावरतो तोवर महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे रत्न म्हणजे प्रा.डॉ.भाई.एन.डी.पाटील यांच्या निधनाने पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. तसा विचार केला तर स्व. आबासाहेब व प्रा.एन.डी.पाटील यांचे जिव्हाळ्याचे तसेच घरोब्याचे संबंध.

उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे कि, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आबासाहेब व पाटील साहेब या दोन जोडीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, कामगारांचा, बहुजन वर्गातील दलित, शोषित, पीडित, पिढ्यानपिढ्या मागासलेल्या कामगार वर्गाचे नेतृत्व केले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार शेवटपर्यंत जोपासला. सामान्यातल्या सामान्य लोकांच्या अडचणीसाठी संपूर्ण आयुष्य झिजवले.एकेकाळी आबासाहेब विधानसभेमध्ये तर प्रा.एन.डी पाटील सर हे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत होते. महाराष्ट्राच्या विकासामध्ये या दोन्ही महानरत्नांचे फार मोठे योगदान आहे, हे नाकारून चालणार नाही.

पुलोद सरकारमध्ये शेकापक्षाच्या वतीने आबासाहेब व प्रा.एन.डी.पाटील साहेब दोन्ही नेते कॅबिनेट मंत्री होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण करत असताना कधीही आपल्या तत्वात, मूल्यात, विचारधारेत तसूभर सुद्धा त्यांनी बदल केला नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा हे तात्पुरते आहे. परंतु सर्वसामान्य लोकांचे, पिचलेल्या वर्गाचे कायमस्वरूपीचे प्रश्‍न मिटवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन्ही नेत्यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. कामगारांना, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. राज्याच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे आधारस्तंभ, कष्टकरी, शेतकरी वर्गाच्या हक्कासाठी लढणारे ते नायक होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतमध्ये सीमावाद, कामगार शेतकर्‍यांसाठी आयुष्य वेचणार्‍या सरांचे विचार व कणखर व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत होते.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या पिचलेल्या वर्गाची सात दशके त्यांनी सेवा केली. राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास आणि आमच्यासारख्या तरुणांचे ते मार्गदर्शक होते. प्रचंड वाचन, अफाट स्मरणशक्ती, प्रभावी वक्तृत्व, अहोरात्र कष्ट, उच्च प्रतिभाशक्ती ही पंचतत्वे सरांच्या व्यक्तिमत्वात कायमच दिसून येत. त्यांनी आयुष्यभर तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. विचाराशी कधीही फारकत घेतली नाही.

महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामध्ये श्‍वेतपत्रिकेचे कृष्णरूप, कोल्हापूर येथील टोल आंदोलन, कापूस एकाधिकार योजना, वीज आंदोलन, काँग्रेस सरकार आणि शेतकर्‍यांची लूट, शेतमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत, शेवटी हे शिक्षण तरी कोणासाठी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारखे लिहिलेले वैचारिक ग्रंथ, खर्‍या अर्थानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी मार्गदर्शक ठरतील.

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच साहित्य आणि वैचारिक लेखन क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा आम्हाला सदैव अभिमान राहील. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणार्‍या एका विचारवंताच्या फळीचे पाटील सर प्रतिनिधी होते. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा होता.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विचाराचे कृतीशील वारसदार म्हणून अखेरपर्यंत त्यांनी काम केले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव व प्रभावी साधन आहे, या विश्‍वासाने गोरगरीब उपेक्षितांच्या उन्नतीसाठी रयत शिक्षण संस्थेचा कारभार पाहिला. त्यांना अनेक मोठमोठ्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले आहे. स्व.आबासाहेबांच्या बरोबर प्रा. एन.डी.पाटील यांचे दुःखद निधन होणे आमच्यासाठी हा फार मोठा दुःखद धक्का आहे. मात्र महाराष्ट्रातील तमाम कष्टकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा, कामगारांचा, उपेक्षितांचा आवाज त्यांच्या प्रेरणेतून, त्यांनी केलेल्या संस्कारातून पुढे असाच चालु ठेवू. एवढच यानिमित्ताने सांगू शकतो.. निशब्द….

Exit mobile version