‘एक मराठालाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला

सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा
सोलापूर | वृत्तसंस्था |
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोलापुरात रविवारी मराठा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला.

यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात हजारो तरुण सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणांचेही धाबे दणाणले. त्यामुळे पोलिसांनी अनेकांची धरपकड केल्याने आंदोलक प्रचंड संतप्त झाले होते.

मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते.

Exit mobile version