| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 2) डिसेंबरला मतदान झाले. एक लाख 66 हजार 858 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अठरा दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रविवारी (दि.21) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाच्या 209 जागांसाठी 629 उमेदवारांपैकी कोणाला शहरी मतदारांनी कौल दिला, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, नगरपरिषद स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये नगरसेवकपदासाठी 595 व नगराध्यक्षपदासाठी 34 असे एकूण 629 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या 217 जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार 503 मतदारांपैकी एक लाख 66 हजार 858 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष 83 हजार 986 व महिला 82 हजार 871 मतदारांचा समावेश होता. नगरपरिषदेच्या निवडणुकीत महिलांपेक्षा एक हजार 115 पुरुष मतदारांनी अधिक मतदान केल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
खोपोलीमध्ये नगराध्यक्षासह 32 जागांसाठी 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात नगराध्यक्षपदासाठी सात व नगरसेवकपदासाठी 118 उमेदवारांचा समावेश होता. अखेर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 42 हजार 535 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 20 हजार 864 महिला व पुरुष 21 हजार 670 मतदारांनी मतदान केले. एकूण 68.52 टक्के मतदान झाले.
अलिबागमध्ये 21 जागांसाठी लढत होती. 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.नगराध्यक्षपदासाठी 2 व नगरसेवकपदासाठी 42 उमेदवारांचा समावेश होता. अलिबागमध्ये 70.31 टक्के मतदान झाले. अकरा हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पाच हजार 853 पुरुष व पाच हजार 645 महिला मतदारांचा समावेश आहे.
श्रीवर्धनमध्ये 21 जागांसाठी लढत होती. 64 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 60 उमेदवारांचा समावेश होता. एकूण 66.23 टक्के मतदान झाले. एकूण आठ हजार 370 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष चार हजार 178 व महिला चार हजार 192 मतदारांनी मतदान केले. मुरूडमध्ये 21 जागांसाठी लढत होती. 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी 58 उमेदवारांचा समावेश होता.
मुरूडमधील आठ हजार 530 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात चार हजार 504 महिला व पुरुष चार हजार 26 मतदारांचा समावेश आहे. एकूण 73.89 टक्के मतदान झाले. रोह्यात 21 जागांसाठी लढत होती. 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात नगराध्यक्षपदासाठी 2 व नगरसेवकपदासाठी 51 मतदारांचा समावेश होता.
रोह्यामधील 12 हजार 708 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 71.92 टक्के मतदान झाले. त्यात सहा हजार 538 महिला व पुरुष सहा हजार 170 मतदारांनी मतदान केले. महाडमध्ये 21 जागांसाठी लढत होती. 58 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी 5 व नगरसेवकपदासाठी 53उमेदवारांचा समावेश होता. सायंकाळपर्यंत 71.3 टक्के मतदान झाले. एकूण 16 हजार 426 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष आठ हजार 166 व महिला आठ हजार 260 मतदारांनी मतदान केले.
पेणमध्ये 25 जागांसाठी निवडणूक होती. 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी 3 व नगरसेवक पदासाठी 72 उमेदवारांचा समावेश होता. पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत 70.39 टक्के मतदान झाले. एकूण 23 हजार 845 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष 12 हजार 216 व महिला अकरा हजार 629 मतदारांनी मतदान केले.
उरणमध्ये 22 जागांसाठी लढत होती. 53 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 49 उमेदवारांचा समावेश होता. सायंकाळपर्यंत 67.92 टक्के मतदान झाले. एकूण 17 हजार 805 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष नऊ हजार 133 व महिला आठ हजार 672 मतदारांनी मतदान केले.
कर्जतमध्ये नगराध्यक्षसह 22 जागांसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी 46 उमेदवारांचा समावेश होता. कर्जतमध्ये 21 हजार 680 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष दहा हजार 953 व महिला 10 हजार 727 मतदारांचा समावेश असून, एकूण 72.37 टक्के मतदान झाले.
माथेरानमध्ये 21 जागांसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 46 उमेदवारांचा समावेश होता.
माथेरानमध्ये 85.35 टक्के मतदान झाले. एकूण तीन हजार 461 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष एक हजार 621 व महिला एक हजार 840 मतदारांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त केले आहेत. मतमोजणीच्यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून, पत्रकार कक्षाचीदेखील व्यवस्था केली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.







