कामथे घाटाची वाट बिकट

घाट निर्मितीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज ; माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश मालुसरे यांची खंत

। पोलादपूर । वार्ताहर ।

म्हाप्रळ-वरंध-भोर-पंढरपूर रस्त्यावरील भोर घाटातील बांधकामासाठी तब्बल दोन महिन्यांचा मेगाब्लॉक घेऊनही भोर घाटातील पडझड सुरूच आहे. भोर घाटाला ताम्हाणी आणि आंबेनळी घाटाचे दोन लगतचे पर्यायी मार्ग असून या मार्गाच्या वापरामुळे लाखो लोकांना कोट्यवधीचा नाहक भुर्दंड होत असल्याने पोलादपूर तालुक्यामध्ये पुणे शहराकडे जाणार्‍या मार्गासाठी तालुक्यातील चिखली गावातील रमेश मालुसरे या माहितीचा अधिकार कार्यकर्त्यानी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामथे ते पुणे जिल्हा हद्द रस्ता क्र. 166 प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, आता कापडे कामथे पुणे घाटाच्या निर्मितीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

पोलादपूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कापडे ते कामथे रस्त्याचे काम 6 वर्षापूर्वीच पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळयात रस्त्याची दूरवस्था झाली. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या काही वर्षांमध्ये राज्य व केंद्रसरकारच्या माध्यमातून पोलादपूर कापडे कामथे पुणे घाटाची स्वप्नपूर्ती 2021 सालापर्यंत शक्य असल्याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश मालुसरे यांनी दिली होती. मात्र, राज्य सरकार नेहमीच कोसळणार्‍या वरंध घाटावर सातत्याने खर्च करीत असल्याने नवीन घाटाची निर्मिती करण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते रमेश मालुसरे यांनी खेदपूर्वक मत व्यक्त केले आहे.

मुंबईत नोकरी करून गावी चिखली येथे भाडोत्री वाहनाने येताना कापडे रस्त्यावरील खड्डयांमुळे नादुरूस्त झालेल्या वाहनामध्ये तब्बल दहा तासांहून अधिक काळ अडकल्याने 16 नोव्हेंबर 2002 पासून कापडे कामथे रस्त्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करणारे रमेश मालुसरे यांना 2005 नंतर माहितीचा अधिकाराचा आधार मिळाला. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा करण्याचे सामान्य माणसाचे प्रयत्न असामान्य ठरू लागले आहे. या कापडे ते कामथे रस्त्यामुळे कापडे बुद्रुकच्या 12 वाड्या, वाकणच्या 12 वाड्या, साखर, आडावळे बुद्रुक, मोरसडे, बोरघर, कामथे या सात गावांचा थेट तर रानवडी, घागरकोंड, बोरावळे, नाणेघोळ, केवनाळे, बोरज, उमरठ, चांदके, ढवळे, आडावळे खुर्द, चिखली, सडे, नावाळे, वडघर, चांदले, साळवीकोंड, गोवेले, खांडज, देवळे, हळदुळे, दाभिळ, लहुळसे व करंजे ही 23 गावे अशी 30 गावांची 19 हजारांहून अधिक लोकसंख्या मूळ रस्त्याला जोडली गेली आहे. त्यामुळे तालुक्याच्या अर्ध्याअधिक लोकसंख्येला मिळालेला हा रस्ता केवळ तालुक्याच्या किंवा बाजाराच्या गावापर्यंत पोहोचविण्यापुरताच न राहता पुणे जिल्ह्याला जोडण्यात यावा आणि येथील शेतीमाल विक्री तसेच सुशिक्षितांना पुणे शहर परिसरामध्ये रोजगार संधी मिळावी, या अपेक्षेने रमेश मालुसरे यांनी माहितीच्या अधिकारामध्ये 2010 पासून केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन कामथे घाटाचा समावेश करण्यात येऊन 2001 ते 2021 पर्यंतच्या यादीमध्ये कामथे ते पुणे जिल्हा हद्द रस्ता क्र. 166 असा प्रस्तावित करण्यात आला आहे.

अलिकडेच, सातत्याने वरंध भोर घाटाची पडझड होत असताना राज्य सरकार याच घाटाच्या दुरूस्तीवर अधिक भर देत दुरूस्तीच्या कामांमुळे वरंध भोर घाटामध्ये तब्बल 2 महिन्यांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. हा घाट दोन महिने बंद राहिल्यामुळे माणगांव, निजामपूर, ताम्हिणी घाट आणि पोलादपूर महाबळेश्‍वर वाई ते पुणे बंगलोर दु्रतगती महामार्ग या पर्यायांचा अवलंब करून लाखो प्रवाशांचे कोट्यवधी रूपये नाहक खर्च होऊन वेळेचाही अपव्यय झाला. पुन्हा भोर घाटामध्ये खरवलीजवळ दोन दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने मेगाब्लॉकनंतरही पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे पोलादपूर, कापडे ते कामथे हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता सक्षम बनविण्यासाठी अलिकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून सर्व पुलांचे बांधकाम नव्याने करण्याची निविदादेखील निघाली आहे.

पोलादपूर तालुक्यातूनच अल्पावधीत पुणे जिल्हा हद्दीपर्यंत नवीन रस्ता अस्तित्वात येण्याचे नियोजन आरटीआय कार्यकर्ते रमेश मालुसरे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 2021 पर्यंत पूर्तता करण्यासाठी दिले होते. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे आरटीआय कार्यकर्ते रमेश मालुसरे यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version