। महाड । वार्ताहर ।
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंधा असे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. मागिल पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता या वर्षी देखील डेंजर झोनमध्ये असून तब्बल एक वर्षाने घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवात केली आहे, सा.बां.विभागाच्या या अजब कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. नुकतीच वरंध घाटात वाघजाई या ठिकाणी लहान स्वरूपातील दरड कोसळली होती यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणार्या महाबळेश्वर आणि वरंध भोर घाटाची सन 2021 मधील अतिवृष्टी मध्ये संपूर्ण घाटात दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकामाने कांही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेल्या मार्गाची आज देखील दुरवस्था आहे. ठीकठिकाणी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे सुरु असून मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. वाघजाई जवळ आलेल्या दरडीत काम करणारा एक स्थानिक नागरिक जखमी झाल्यानंतर हा घाट 1 जुलै ते 30 सप्टेंबर असा तीन महिन्याकरिता बंद ठेवण्याचा निर्णय देण्यात आला.

महाड वरंध भोर पुणे पंढरपूर या घाटामुळे महाड आणि भोर मध्ये व्यापार आणि दळणवळण करणे सोपे झाले आहे. या मार्गावर असलेल्या घाटामुळे माझेरी, पारमाची पुढे भोर हद्दीतील शिलीम कुंड, राजीवडी, हिरडोशी, साळुंगण, उंबर्डेवाडी, शिरगाव या गावातील ग्रामस्थांना खरेदीसाठी बिरवाडी आणि महाड मध्ये येणे शक्य होते. भाजी विक्रेते, एस.टी बसेस, किरकोळ विक्रेते, पर्यटक याच मार्गाचा वापर करत आहेत. घाटातील सौंदर्य देखील ऐन पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत गेली. मात्र दरवर्षी या घाटात सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. वरंध पासून भोर पर्यंत डोंगर भाग असल्याने मातीचा भाग कोसळून रस्त्यावर येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सतत खोदकाम करत कामे करत असल्याने माती खाली येण्याचे प्रमाण वाढत चालत आहे.
वरंध घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दरडी आणि माती हटवण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली आहे. यामध्ये सरंक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई, आदींचा समावेश आहे. पाउस सुरु झाला असला तरी घाटात दुरुस्ती आणि सरंक्षक भिंतीची कामे केली जात आहेत. अवाढव्य स्वरूपात आलेल्या मातीच्या दरडी पाहता सद्य स्थितीत बांधत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती मुसळधार पावसामध्ये किती टिकतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे घाटाची दुरुस्ती याकरता कोट्यावधी रुपया आतापर्यंत खर्च करण्यात आले परंतु कायमस्वरूपी घाटाची दुरुस्ती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.