| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 5 मे 2025 रोजी जाहीर करणार आहे. मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो उद्या निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी, उद्या सकाळी 11 वाजता बोर्डाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा बारावीचा निकाल, तसेच विविध विभागांनुसार निकालाची आकडेवारी आणि वैशिष्ट्ये जाहीर केली जातील. या पत्रकार परिषदेनंतर, दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने mahresult.nic.in या वेबसाईटचा समावेश आहे.
या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
hsc.mahresults.org.in
निकाल कसा चेक कराल?
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.