| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील आनंदवाडी येथे प्रवासी रिक्षाच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.03) रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश लहू तावडे हे आपल्या ताब्यातील प्रवासी रिक्षा तळा ते बोरघर असे प्रवासी भाडे घेऊन जात असताना आनंदवाडी बसस्टॉपच्या पुढे शंभर मीटर अंतरावर उभ्या असलेल्या डंपरच्या चालकाने कोणतीही लाईट अथवा चिन्ह न लावता डंपर तसेच अंधारात उभे करून ठेवल्याने या डंपरला रिक्षा धडकून अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक निलेश तावडे व प्रवासी राहुल पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय तळा येथे दाखल करण्यात आले. यातील प्रवासी राहुल पवार यांना गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, रिक्षाच्या नुकसानीस व राहुल पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे डंपर चालक भैरव विमलराज मेहता याच्यावर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खिरीट हे करीत आहेत.