अखेर प्रतीक्षा संपली! जंजिरा किल्ल्याजवळील ब्रेकवॉटर, प्रवासी जेट्टीचे उद्या लोकार्पण

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याजवळ उभारण्यात आलेल्या ब्रेकवॉटर आणि प्रवासी जेट्टीच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या दि. 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाने सागरमाला योजनेंतर्गत तब्बल 93.56 कोटी रुपये खर्च करून ही अत्याधुनिक जेट्टी उभारली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे मानले जात आहे.

राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील अरबी समुद्रात असलेल्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना चढ-उतार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः भरती-ओहोटी आणि खराब हवामानात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ब्रेकवॉटर आणि प्रवासी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, अखेर आता या जेट्टीला लोकार्पणाचा मुहूर्त मिळाला आहे.

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या जेट्टीचे लोकार्पण होणार असून, खासदार सुनील तटकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आमदार रवींद्र पाटील तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रकल्पामुळे जंजिरा किल्ल्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ जलवाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीलाही याचा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version